सयाजी शिंदे यांचा मदतीचा हात, ‘सखाराम बाइंडर’च्या 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

नुकतेच मराठवाड्यात झालेल्या भीषण पावसामुळे मराठवाडा कोलमडला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक मातीमोल झाले. केवळ पीकच नाही तर, जमिनच खरडून वाहून गेली. त्यामुळे मराठवाडा अतिवृष्टीच्या सावटाखाली आहे. पुरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने इथला शेतकरी आता हताश आणि निराशेच्या गर्तेत आहे. मराठवाड्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांनी त्यांच्या सखाराम बाइंडर या नाटकाच्या १० प्रयोगाचे मानधन हे मराठवाड्यासाठी देऊ केले आहे.

दिल्लीमध्ये ‘सखाराम बाइंडर’ नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर सयाजी शिंदे यांनी त्यांच्या पुढील १० प्रयोगाचे मानधन हे पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचे ठरवले आहे. दिल्लीतील प्रयोगातून जमा होणारे सर्व उत्पन्न पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून दिले जाणार असल्याची माहिती कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी दिली.

यापुढील सुमुख चित्र प्रोडक्शनतर्फे सखाराम बाइंडरचे पुढील दहा प्रयोग, सयाजी शिंदे केवळ १ रुपया मानधन घेऊन करणार आहेत. तसेच या १० प्रयोगांची मानधनाची पूर्ण रक्कम मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिली जाईल.

मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर सयाजी शिंदे म्हणाले, ” सध्याच्या घडीला महाराष्ट्रात पूरपरिस्थिती प्रचंड बिकट आहे. त्यामुळे या शुभारंभाच्या प्रयोगाचा नफा आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत. तसेच मी माझं पुढील 10 प्रयोगांचं मानधन पूरग्रस्तांना देणार आहे.

विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक अभिजात कलाकृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. 1972 साली प्रदर्शित झालेल्या या नाटकामध्ये, सध्या दिग्गज अभिनेते सजाजी शिंदे आणि नेहा जोशी महत्त्वाची भूमिका वठवत आहेत.