
बुडीत कर्जांमुळे अनेक बँका डबघाईला आल्या असून ‘पीएमसी’सारख्या बँकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असतानाही स्टेट बँक ऑफ इंडियाने मात्र ग्राहकांना आशेचा नवा किरण दाखवला आहे. एसबीआयने बुडीत कर्जांचे प्रमाण घटवले असून चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत बँकेला तब्बल 3 हजार 11 कोटींचा नफा झाला आहे.
गेल्या वर्षी बँकेला 944.87 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱया तिमाहीत बँकेच्या उत्पन्नात 3 टक्क्यांची वाढ झाली. बँकेला 72,850.78 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. एप्रिल ते जून यादरम्यान बँकेचे उत्पन्न 70,653.23 कोटी रुपये इतके होते. दरम्यान, बँकेने आपल्या कामकाजात पारदर्शकता आणली. 30 सप्टेंबर 2019 रोजी बँकेच्या एकूण एनपीए म्हणजेच बुडीत कर्जात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन तो 7.19 टक्क्यांवर पोहचला. गेल्या वर्षी हाच एनपीए 9.95 टक्के इतका होता.

























































