अर्थव्यवस्थेला स्टेट बँकेचाही झटका,विकास दराचा अंदाज 4.2 टक्क्यांपर्यंत घटवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

मंदीच्या दुष्टचक्रात अडकलेली अर्थव्यवस्था अजून वर्षभर तरी डोके वर काढेल अशी चिन्हे नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडियाने दुसऱया तिमाहीतील विकास दर 4.2 टक्क्यांपर्यंत घसरेल तसेच वर्षभरासाठी तो  5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज म्हणजे अर्थव्यवस्थेला जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, रिझर्व्ह बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यापाठोपाठ स्टेट बँकेने दिलेला मोठा झटका मानला जात आहे.

स्टेट बँकेने मंगळवारी आपला ‘एकोरॅप’ अहवाल जारी करून विकास दराच्या घसरणीचे भाकीत केले. 2019-20 या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या विकास दराचा अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातील विकास दर 6.2 टक्क्यांवर जाईल, असेही बँकेने या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, देशाचा पहिल्या तिमाहीतील विकास दर 5 टक्के राहिला आहे. गेल्या सहा वर्षांतील विकास दराची ही सर्वात नीचांकी पातळी ठरली आहे.

डीबीएस बँकेनेही व्यक्त केली चिंता

अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबाबत डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरनेसुद्धा (डीबीएस) चिंता व्यक्त केली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील विकास दराचे आकडे चिंताजनक असतील. सहा वर्षांत पहिल्यांदाच विकास दर 5 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम अमेरिकन डॉलर आणि हिंदुस्थानच्या रुपयावर होईल, असे डीबीएसने आपल्या अहवालात म्हटले आहे.

विकास दरात घट होण्यामागील कारणे

ऑटोमोबाइल विक्रीत घट, उड्डाण क्षेत्रातील मंदी, औद्योगिक उत्पादनातील घसरण, बांधकाम तसेच पायाभूत प्रकल्पांतील गुंतवणुकीचे घटलेले प्रमाण ही कारणे विकास दराला मारक ठरली आहे. त्याचबरोबर देशातील काही भागांत पाऊस आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचाही फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचे जाणकारांचे मत आहे.