
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने खातेधारकांना नव्या वर्षात मोठी खूशखबर दिली आहे. नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS ट्रान्सफरसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, एसबीआयच्या शाखेतून पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.
एसबीआयच्या शाखेतून IMPS ट्रान्सफरसाठी पूर्वीइतकेच शुल्क असेल. तर 2 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी 20 रुपये आधिक जीएसटी एवढे शुल्क द्यावे लागेल. तर नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा योनो अॅपद्वारे करण्यात येणाऱ्या 5 लाखांपर्यंतच्या IMPS ट्रान्सफरसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. हा नियम फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे.
एसबीआयच्या शाखेतून IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 1 हजार रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क लागत नाही. मात्र, 1 ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी 2 रुपये अधिक जीएसटी एवढे शुल्क लागते. तर 10 हजार ते 1 लाखपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी 4 रुपये आधिक जीएसटी एवढे शुल्क आकारले जाते. तर 1 ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरसाठी 12 रुपये आधिक जीएसटी असे शुल्क आकारण्यात येते.
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी IMPS हा सर्वास सोपा पर्याय आहे. रविवारी किंवा बँका बंद असतानाही सहजतेने पैसे ट्रान्सफर करता येतात. तसेच नेटबँकिंग, मोबाईल आणि योनो अॅप द्वारे या पर्यायाचा 24 तासात कधीही वापर करता येतो. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2021मध्ये IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली होती. त्यानंतर बँकांनी 2 ते 5 लाख रुपयांच्या IMPS ट्रान्सफरसाठी शुल्क निश्चित केले आहेत. एसबीआयने नव्या वर्षात खातेधारकांना खूशखबर दिली आहे. नेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे IMPS ट्रान्सफरसाठी खातेधारकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.



























































