देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ची चांदी; नफ्यात 12% वाढ

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) शुक्रवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात बँकेने दर वर्षांच्या तुलनेत या वर्षात 12% नफा कमावला आहे. बँकेचा वार्षिक नफा 19,160 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 17,035 कोटी रुपये होता. बँकेचा नफा बाजाराच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.

जून तिमाहीत स्टेट बँकेने व्याजातून 1,17,996 कोटी रुपये कमावले, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 1,11,526 कोटी रुपयांपेक्षा 6% जास्त आहे. त्याच वेळी, एसबीआयने 76,923 कोटी रुपये व्याज म्हणून दिले. जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 70,401 कोटी रुपयांपेक्षा 9% जास्त आहे. बँकेने म्हटले आहे की त्यांनी त्यांचे कामकाज सुधारले आणि खर्च नियंत्रणात ठेवला म्हणून त्यांचा नफा वाढला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 41,072 कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या 41,125 कोटी रुपयांपेक्षा किंचित कमी (0.13%) आहे. तसेच, निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) देखील 3.22% वरून 2.90% पर्यंत कमी झाले. एसबीआयचा ऑपरेशनल नफा आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 26,449 कोटी रुपयांवरून 15% वाढून आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत 30,544 कोटी रुपयांवर पोहोचला.

बँकेचे एकूण कर्ज आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत 12% वाढून 42.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या वर्षी 38.12 लाख कोटी रुपयांवर होते. किरकोळ वैयक्तिक कर्ज 13% वाढून 15.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. कृषी क्षेत्र देखील 13% वाढून 3.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एसएमई आणि कॉर्पोरेट क्षेत्रांनी अनुक्रमे 19% आणि 5.7% वाढ नोंदवली. एसबीआयच्या एकूण ठेवींमध्ये आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 49.01 लाख कोटी रुपयांवरून 12% वाढून 54.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचला.