गीर अभयारण्यात सिंहाचा मृत्यू ही गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुजरातमधील सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर अभयारण्यात गेल्या वीस दिवसात 23 सिंहाचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली असून सिंहाच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे असे निर्देश देत त्यांना झापले आहे. सिंहाच्या मृत्यूमीगाल नेमके कारण शोधावे आणि सिंहाना वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील धनखानिया रेंजमध्ये 26 सिंह होते. त्यातील 23 सिंहाचा मृत्यू झाल्याने आता फक्त 3 सिंहच शिल्लक राहिले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी वन प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसची (सीडीव्ही) लागण झाल्याने आणि प्रोटोझोवाच्या संक्रमणामुळे या अभयारण्यातील सिंहाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या 20 दिवसात 23 सिंह दगावल्याने वन प्रशासन हादरले आहे. आता इतर सिंहाना संक्रमणापासून वाचवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या व्हासरची लागण झालेल्या सिंहाना वाचवणे कठीण असते. या व्हायरसमुळे 1994 मध्ये तंजानियात एक हजार सिंहाचा मृत्यू झाला होता. जंगली कुत्रे, जनावरे आणि चाऱ्यातून या व्हायरसचे संक्रमण होते. कुत्र्यांपासून मोठ्या प्रमाणात हा व्हायरस पसरतो. तसेच रोगाची लागण झाल्यानंतर सुमारे आठवडाभरानंतर या रोगाचे निदान होत असल्याने औषधोपचार करणेही कठीण असते. 12 सप्टेंबरला सिंहाना याची लागण झाल्याचे उघड झाले. चार सिंहाचा मृत्यू सीडीव्हीमुळे तर 17 सिंहाचा मृत्यू प्रोटोझोवा व्हायरसमुळे झाल्याचे वन विभागाने सांगितले. 2011 नंतर दोनवेळा वन विभागाला या व्हायरसबाबत अलर्ट देण्यात आल्याचे सांगण्यात आले.