
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि जम्मू-कश्मीर प्रशासनाला न्यायालयाने नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर मागवले आहे.
‘कश्मीर टाइम्स’च्या संपादिका अनुराधा भसीन, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार मोहम्मद अकबर, ऍड. एम. एल. शर्मा यांच्यासह काही जणांनी 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर एकत्रितपणे पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने आज सांगितले.
सीमेपलीकडे पडसाद उमटतील : केंद्र सरकार
ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी केंद्र सरकारला नोटीस बजावण्याची गरज नाही असे सांगितले. अशा नोटिसीचे पडसाद सीमेपलीकडे उमटतात. सरकारने जे संयुक्त राष्ट्र संघात सांगितले (युनो) तेच न्यायालयापुढे मांडले आहे. त्यामुळे नोटीसची गरज नाही अशी भूमिका वेणूगोपाल आणि मेहता यांनी मांडली, मात्र सरन्यायाधीश गोगोई यांनी नोटीस मागे घेण्यास नकार दिला. आमचा निर्णय बदलणार नाही असे सांगितले.

























































