शिया वक्फ बोर्डाची मागणी, ‘चाँद तारा’ असलेले हिरवे झेंडे हटवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
flag_of_pakistan

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानात काही इमारती आणि धार्मिक स्थळांवर ‘चाँद तारा’ हे चिन्ह असलेले हिरवे झेंडे फडकताना दिसतात. ते झेंडे ‘इस्लामविरोधी’ असल्याचे सांगत त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी दाखल केली आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

‘चाँद तारा’ हे चिन्ह असलेल्या हिरव्या झेंडय़ांना आक्षेप घेणारी याचिका शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सईद वासीम रिझवी यांनी दाखल केली आहे. ती याचिका न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आली होती. त्यावेळी रिझवी यांच्या मागणीवर केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने त्या याचिकेची एक प्रत ऍडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना खंडपीठाने दिली.

तो झेंडा कोणाचा?

स्वातंत्र्यपूर्व काळात १९०६ सालात नवाझ वकार उल मलिक आणि मोहम्मद अली जीना यांनी ‘मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. ‘चाँद तारा’ हे चिन्ह असलेला हिरवा झेंडा त्या पक्षाचा आहे. मुसलमान लोक त्याला ‘इस्लामिक’ मानत आले असले तरी इस्लामशी त्याचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे शिया वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे.