
सामना प्रतिनिधी, शिराढोण
दहावीच्या परीक्षेत अत्यंत कष्टाने 95 टक्के गुण मिळवूनही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, या धास्तीने गुणवंत विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशीव जिल्हय़ात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धाराशीव जिल्हय़ाच्या कळंब तालुक्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर (16) असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. शहाजी देवकर यांना 5 एकर कोरडवाहू शेती असून, अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही शहाजी यांनी अक्षयला लातूरच्या साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले. अक्षयनेही परिस्थितीचे भान ठेवत अत्यंत कष्टाने दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवले. गणितामध्ये त्याला 99 गुण मिळाले. लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पुढे त्याला मेडिकलला जायचे होते.
चांगले गुण मिळवूनही उपयोग नाही
दहावीची बदललेली परीक्षा पद्धती, रद्द करण्यात आलेले अंतर्गत गुण आणि प्रवेशासाठी असलेली अत्यंत जीवघेणी स्पर्धा याचा विद्यार्थ्यांवर अतिशय प्रतिकुल परिणाम होत आहे. कितीही गुण मिळवले तरी चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.
























































