
सामना प्रतिनिधी, मुंबई
फ्रूट ज्यूस, फ्लेव्हर्ड मिल्क पिऊन झाल्यानंतर कागदी ट्रेटा पॅक कचऱ्यात फेकून दिले जातात. पण हेच रिकामे टेट्रा पॅक जमवून त्यापासून एका संस्थेने चक्क शाळेची बाके बनवली आहेत. या संस्थेने ही इकोफ्रेंडली बाके वांद्र्यातील पालिकेच्या शाळेला भेट दिली आहेत.
अन्नप्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रात काम करणाऱ्या टेट्रा पॅक इंडिया या कंपनीने टेट्रा पॅकपासून शाळेची बाके, वह्या, छपरावर घालायचे कागद अशा अनेक वस्तू तयार केल्या आहेत. गेल्या आठ वर्षांपासून मुंबईत टेट्रा पॅक जमवण्यासाठी कंपनीने यंत्रणा उभारली होती. पुठ्ठय़ाच्या कार्टनचे रिसायकलिंग करण्यासाठी कंपनीने ‘कार्टन्स ले आओ, क्लासरूम बनाओ’ असा उपक्रम राबवला होता. या उपक्रमातून जमा झालेल्या कार्टन्सपासून तयार केलेले वर्गातील फर्निचरचे दहा सेट भेट दिले. वांद्रय़ातील सुपारी टँक या पालिकेच्या शाळेला भेट दिले आहेत. स्वातंत्र्यदिनी संस्थेने एच-वेस्ट वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त शरद उघाडे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्राचार्या माधुरी डिसुझा यांच्याकडे ही भेट दिली.
टेट्रा पॅक गोळा करण्यासाठी 180 केंद्रे
मुंबईकरांनी वापरून फेकलेले टेट्रा पॅकचे कार्टन्स जमा करण्यासाठी संस्थेने 180 केंद्रे तयार केली आहेत. सुपारी टँक महापालिका शाळेतही जमा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. येथील विद्यार्थी आणि कर्मचारी लोकांकडून वापरलेली कार्टन जमा करत असतात. या टेट्रा पॅकपासून तयार केलेले तब्बल 260 डेस्क काही वंचित गटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्थेने दिले आहेत. हे फर्निचर अतिशय सुंदर आणि भक्कम असल्याचा दावा संस्थेने केला आहे.



























































