शालेय शुल्क वाढविणाऱ्या अधिनियमात सुधारणा करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुल्क विनियमन अधिनियमात सुधारणा केल्याने शालेय शुल्कवाढीबाबत शाळा व्यवस्थापनाला मोकळे रान मिळाले. यामुळे पालकांवर अन्यायकारक फीवाढ लादली जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात आले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना-युवासेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन हा सुधारणा अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली.

पालकांवर अन्यायकारक असलेले शुल्क विनियमन अधिनियम याचे सुधारणा विधायक तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री यांनी अनभिज्ञपणे पारीत करून घेतले होते. याचा रोष पालकांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. पालकांना दिलासा मिळावा यासाठी फी वाढीसंदर्भातील विधेयकामध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन सादर केले. तसेच आमदार विलास पोतनीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे या विधेयकामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या अधिनियमामध्ये पुढील पाठपुरावा व योग्य त्या सुधारणा करून घेण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार ऍड. अनिल परब व आमदार विलास पोतनीस यांना दिल्या आहेत, जेणेकरून पालकांना न्याय व दिलासा मिळेल. यावेळी आमदार ऍड. अनिल परब, आमदार विलास पोतनीस, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे व अमित पाटील आदी उपस्थित होते.