शालेय पोषण आहारात ‘ठेकेदारी’ लादू नका !मालवणातील महिला बचतगट आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मालवण

मालवण पालिका हद्दीतील शाळांना महिला बचतगटांकडून दिला जाणारा पोषण आहार बंद करून तो ठेकेदारी पद्धतीने देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या महिला बचत गटांनी तीव्र विरोध केला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महिला बचत सदस्यांनी पंचायत समिती शिक्षण विभागावर धडक दिली. कोणत्याही परिस्थितीत तालुक्याबाहेरच्या ठेकेदारास हे काम देऊ नये असा इशारा या महिलांनी दिला आहे.

शहरात पालिका हद्दीतील शाळांना शहरातील महिला बचतगटांकडून शालेय पोषण आहार गेली सतरा ते अठरा वर्षे दिला जात आहे. यात दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला बचतगटांना शिक्षण विभागाच्यावतीने शालेय पोषण आहाराचा नवा ठेका देण्यात आल्याने तुम्ही ३१ जुलैपासून शालेय पोषण आहार देण्याचे बंद करण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने महिला बचतगटांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्‍नाबाबत महिला बचतगटाच्या प्रतिनिधींनी पंचायत समितीच्या येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत यांना जाब विचारला. ठेकेदारी पद्धतीमुळे शहरातील १४ बचत गटात कार्यरत १०० महिलांवर गंडांतर येणार असल्याने हा ठेका तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या समस्येबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठवला असून ठेका प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती घेण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिली आहे.