
मुंबई-ठाण्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दहावी-बारावीचे विद्यार्थीही सर्दी, खोकला, तापाने आजारी आहेत. अशा परिस्थितीत पालकांना मुलांची चिंता वाटत असून शाळास्तरावर होणारी प्रिलियम आणि प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थी कशी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे मुंबई आणि परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दहावी-बारावीचे ऑफलाइन वर्ग बंक करण्याची मागणी होत आहे. मात्र अनेक शाळांनी प्रिलियम परीक्षांचे आयोजन केले आहे. परीक्षा घेण्याआधी सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. तर काही पालकांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली असून लस घेतल्यानंतर होणारे साइड इफेक्ट लक्षात घेऊनच लस घेणार असल्याचे काही पालकांनी सांगितले.
कोरोना रुग्ण सापडलेल्या शाळांना आठ दिवसांची सुट्टी द्या
प्रत्येक शाळेत एखादा किंवा अधिक कर्मचाऱयांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा शाळांना किमान पुढील आठ दिवसांची सुट्टी देऊन सर्वांना वर्क फ्रॉम करण्याची परवानगी द्यावी. तसेच दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याच्या तातडीने सूचना द्याव्यात अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे
केली आहे.
दहावी-बारावी ऑनलाइन वर्गांबाबत सोमवारी निर्णय?
मुंबई महापालिका क्षेत्रातील दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाइन घ्यायचे की ऑनलाइन याविषयी सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. लवकरच शाळांमधून बोर्डाच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी विषयांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांना शाळेत येऊन द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे याविषयी विचारविनियम करून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
































































