शाळा सुरू झाल्या तरी सहामाही परीक्षा ऑनलाइनच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे. लेखी परीक्षा घेण्याविषयी अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून सूचना मिळालेल्या नाहीत. त्यातच अद्यापही अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत न येता ऑनलाइन वर्गांनाच उपस्थित राहात आहेत. सहामाही परीक्षा लेखी स्वरूपात घेतली तर या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न शाळांसमोर आहे. त्यामुळे सध्या तरी सहामाही परीक्षा ऑनलाइन होईल, अशा सूचना शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

शाळा सुरू करण्याचा निर्णय होण्यापूर्वीच अनेक शाळांनी ऑनलाइन सहामाही परीक्षांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यात बदल करणे आता शक्य नसल्याचे कुर्ला येथील गांधी बालमंदिर हायस्कूलचे शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितले. कित्येक विद्यार्थी गावी असून दिवाळीनंतर त्यांचे मुंबईत येण्याचे नियोजन आहे. सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत आल्यावर दिवाळीच्या सुट्टीनंतर परीक्षा घेणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांची कसरत
शाळा सुरू झाली तर जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांच्यासाठी शिक्षकांना ऑनलाइन वर्ग घ्यावे लागत आहेत. या वर्गांसोबतच शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गातही शिकवावे लागते. सोशन डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी एक तुकडी दोन पेक्षा अनेक वर्गात विखुरली गेल्याने एक पाठ एकापेक्षा जास्त वेळा शिकवावा लागत असल्याने सध्या शिक्षकांची ऑनलाइन, ऑफलाइन कसरतच सुरू आहे.