घाऊक महागाईचा 10 महिन्यांतील उच्चांक,  उन्हाळा सुरू होताच महागाईचा भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईने पेटवले आहे. जानेवारी महिन्यात घाऊक महागाई वाढली असून महागाईचा निर्देशांक 1.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 10 महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन गरजेसाठी लागणाऱया वस्तू, खाद्यान्न तसेच भाजीपाला महागल्यामुळे घाऊक महागाई वाढली आहे. महागाई वाढल्यास नजीकच्या काळात आरबीआय व्याजदरांबाबत निर्णय घेऊ शकते.

वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईचा निर्देशांक 0.83 टक्के होता, तर मार्च 2025 मध्ये 2.05 टक्क्यांवर महागाईचा निर्देशांक होता. जानेवारी महिन्यात खाद्यान्न महागाई वाढली. डिसेंबरमध्ये खाद्यान्न महागाईचा दर 0.43 टक्के होता, तो जानेवारीत वाढून 1.55 टक्क्यांवर आला. भाजीपाल्याचा महागाईचा दर जानेवारीमध्ये वाढून 6.78 टक्क्यांवर आला. याशिवाय उत्पादन क्षेत्रातील महागाई 1.82 टक्क्यांवरून वाढून 2.86 टक्क्यांवर पोहोचली. बिगर अन्न घटकांच्या श्रेणीत येणाऱया इतर वस्तूंची महागाई 2.95 टक्क्यांवरून 7.58 टक्क्यांवर गेली आहे. जानेवारीत भाजीपाल्याचे दर वाढले.

आवक वाढली तरी प्रमुख भाज्या महागच

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भाज्यांची आवक वाढली होती. त्यावेळ मेथी, पालक, शेपू यासारख्या पालेभाज्या स्वस्त होत्या. मात्र फुलकोबी, गवार, पावटा, मटार, फरसबी इत्यादी भाज्यांचे दर वाढले होते. साधारणतः 25 ते 30 रुपये पाव किलो अशा दराने किरकोळ बाजारात भाजीपाला विक्री होत होती. यामुळे जानेवारी महिन्यातील भाजीपाल्याचा महागाईचा दर वाढला आहे.