
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे दांडी मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. फक्त प्रॅक्टिकल्स करायचा आणि खासगी कोचिंग क्लासला नियमित हजेरी अशी प्रथा हल्ली सुरू आहे. आता या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी विज्ञान शाखेच्या आता प्रत्येक विद्यार्थ्याची आता बायोमेट्रिक्स हजेरी घेण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. बायोमेट्रिक्स हजेरी न घेणाऱया कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता रद्द होईल.
कोचिंग क्लासला दणका
शिक्षण विभागाच्या या बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयामुळे कोचिंग क्लासवाल्यांना दणका बसला आहे. मान्यता रद्द होऊ नये म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांना आता बायोमेट्रिक मशीन्स लावाव्याच लागणार आहेत आणि बायोमेट्रिक हजेरी लावणे विद्यार्थ्यांना अनिवार्य होणार आहे. ठरावीक तासांची उपस्थिती त्यांना लावावी लागणार असून त्याची अचूक नोंद बायोमेट्रिक मुळे ठेवता येणार आहे.
युवासेनेच्या दणक्यानंतर शिक्षणमंत्र्यांना आली जाग
अकरावी, बारावीचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित कॉलेजला न जाता फक्त प्रॅक्टिकल्स परीक्षेपुरते कॉलेजला हजेरी लावतात. वर्षातील पूर्ण शैक्षणिक तास हे विद्यार्थी कोचिंग क्लासला हजेरी लावतात. क्लासेस आणि कॉलेजमध्ये करार होत असून ‘इंटिग्रेटेड’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये वसूल केले जात आहेत. गेल्या वर्षीपासून युवासेना ‘इंटिग्रेटेड’च्या नावाखाली आवाज उठवीत आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात आला होता. स्टिंग ऑपरेशन करून शिक्षण विभागाकडे पुरावेही सादर करण्यात आले. या वर्षी पुन्हा १२ जून रोजी युवासेनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची भेट घेतली व इंटिग्रेटेड प्रवेश प्रक्रिया छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले. अखेर शुक्रवारी इंटिग्रेटेड कॉलेजसंदर्भात कडक नियमावलींचा अध्यादेश जारी करण्यात आला.
खासगी महाविद्यालयांनाही बंधनकारक
राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक्स पद्धतीने हजेरी घेण्यात येईल.

























































