आनुवंशिक शास्त्रज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शैलेश माळोदे

प्रा. विदिता वैद्य. विज्ञानाच्या जैव रसायन शाखेच्या अभ्यासक. आनुवंशिक बदल, तणावावर मात इ. अनेक विषयांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.

साधारण पंधरा वर्षांपूर्वी ब्रिटिश कौन्सिलने टी. आय. एफ. आर. मुंबईबरोबर विज्ञान पत्रकार आणि वैज्ञानिकांना एकत्र आणून एकमेकांना नीट समजून घ्यावं यासाठी मुंबईत एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यापूर्वीपासूनच हा विषय माझ्या मनात होताच. त्याच उद्दिष्टाने मी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये काही महिने व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजमध्ये व्यतीत केले होते. तेव्हा या कार्यशाळेत माझी भेट झाली प्रा. विदिता वैद्य या वैज्ञानिकाशी. त्यावेळी अत्यंत उत्साही आणि आग्रही व्यक्तिमत्त्वाच्या असलेल्या प्रा. वैद्य आतादेखील लोकांपर्यंत पोहचणं हे वैज्ञानिकांचे कर्तव्यच आहे हे मानणाऱया आहेत. त्यांच्या या विचारामुळे मला वैज्ञानिकांची एक नवी खुली पिढी आकारास येत असल्याचे जाणवलं होतं.

गेल्या डिसेंबरमध्ये श्री पद्मावती व्यंकटेश्वरा फाऊंडेशन (एसपीव्ही फाऊंडेशन), विजयवाडा यांनी वैद्यकीय शिक्षण आणि सेवा या क्षेत्रातील संशोधनासाठी तीन कोटी रुपयांचा निधी व प्रा. विदिता वैद्य यांच्या टीआयएफआरमधील प्रयोगशाळेत जैविक आणि रासायनिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी जाहीर केलाय. प्रा. विदिता वैद्य सध्या मानवी व्यवहारातील विविध बदलांस जबाबदार असणाऱया विविध रेणवीय, आनुवंशिक आणि पेशीय बदलांबाबत संशोधन करीत आहेत.

माझे आई-वडील दोघेही क्लिनिशियन/ वैज्ञानिक आहेत आणि काका मलेरिया पॅरासायटॉलॉजिस्ट. म्हणजे आमचं घराणंच वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातलं. त्यामुळे साहजिकच माझा ओढादेखील त्याकडेच होता, असं प्रा. वैद्य यांनी अगदी हसत हसत सांगितलं. प्रा. वैद्यांना त्यामुळे न्यूरोवैज्ञानिक होण्यासाठीचं प्रोत्साहन आपसूकच लाभलं. वडील क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट आणि आई एन्डोकॉनॉलॉजिस्ट, परंतु माझ्यावर डायन फॉसी आणि डॉ. जेन गुडाल यांचादेखील खूपच प्रभाव होता.

सेंट झेव्हियर महाविद्यालयातून लाइफ सायन्सेस आणि जैवरसायन शास्त्रात पदवी मिळविल्यावर मी येल विद्यापीठातून प्रा. रॉनल्ड डय़ुमन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर मी कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूट (स्वीडन) आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ (युके) मध्ये पोस्ट डॉक्टरचं संशोधन केलं. मार्च 2000 मध्ये हे संशोधन पूर्ण करून मी हिंदुस्थानात परतले आणि टीआयएफआरमध्ये प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून रुजू झाले. आपल्या टीआयएफआरपूर्व करीअरचा थोडक्यात धांडोळा घेत प्रा. वैद्य यांनी जणू संपूर्ण जीवनपटच खुला केला.

शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक प्राप्त झालेल्या प्रा. वैद्य 29 वर्षांच्या असताना टीआयएफआरमध्ये काम करू लागल्या. 2000 ते 2005 या काळातच त्या इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या असोसिएट आणि वेलकम ट्रस्टच्या सोव्हरसीज वरिष्ठ संशोधन फेलो होत्या. आपल्या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं, ‘‘आपल्या मेंदूतील चेतापेशींचं जाळं आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवतात आणि त्यांच्यामधील बदलांना आपल्या आयुष्यातील बदल प्रभावित करीत असतात. त्याचवेळी तयार होणारी नैराश्य बोधक रसायनंदेखील आपली भूमिका बजावतात. मी आणि माझा गट प्रामुख्यानं नैराश्य आणि पूर्वायुष्यातील अनुभवांमुळे आताच्या वागणुकीतील पडणाऱया बदलांविषयी संशोधन करीत आहे. माझ्या संशोधनाचा केंद्रबिंदू सेरोटोनिनची भूमिका प्रसूतीनंतर बाळाच्या महत्त्वाच्या वाढीच्या वेळी भावभावनांचं चेतापेशीय जाळे विकसनाबाबत काय आहे या गोष्टीभोवतीच्या अभ्यासाविषयी आहे. त्याद्वारे आपल्याला नैराश्यावर प्रभावी औषध शोधण्यासाठी मदत होऊ शकेल.’’ त्यांच्या प्रयोगशाळेत उंदीर आणि मूषकांवर प्रयोग करण्यात येतात. विदितांचं कार्य एखाद्या व्यक्तीद्वारे भीती किंवा त्यावर मात करण्याची पद्धत तणावाच्या प्रसंगी काय काम करते हे समजावून घेण्याशी निगडीत आहे.

प्रा. विदिता वैद्य सध्या इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमीच्या फेलो तर आहेतच, पण त्या सोसायटी फॉर न्यूरोसायन्स आणि एन्डोक्राईन सोसायटीमध्येदेखील कार्यरत आहेत.

फिरण्याची, वाचनाची आणि नृत्याची आवड असलेल्या प्रा. विदिता वैद्य यांच्या संशोधनाविषयीचे शोधनिबंध विविध प्रथितयश नियतकालिकांतून प्रकाशित झालेत. 2012 साली ‘नॅशनल बायोसायन्स ऍवार्ड फॉर करीअर डेव्हलपमेंट’ प्राप्त प्रा. वैद्य संशोधनात करिअर करू इच्छिणाऱया तरुणींसाठी एक रोल मॉडेल आहेत, यात शंका नाही.

प्रा. सीएनआर राव यांच्यापासून या सदराची झालेली सुरुवात खरोखरच आता प्रा. विदिता वैद्य यांच्याशी गप्पांच्या स्वरूपात एका लॉजिकल पूर्णत्वाकडे आलीय. 84 वर्षांचे प्रा. राव ते 49 वर्षांच्या प्रा. वैद्य यांच्या रूपाने हिंदुस्थानी वैज्ञानिकांच्या पिढय़ा बदलत गेल्याचं लक्षात येतं. विज्ञान पत्रकारितेच्या, लेखनाच्या आणि रेडिओप्रसारणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठीच्या लाभलेल्या संधीनं माझं जसे करिअर घडवले तसेच या वैज्ञानिकांच्यादेखील संपर्कात आणलं. काहींबरोबर पटकन लय जुळली आणि संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून त्यांना माणूस आणि वैज्ञानिक म्हणूनही समजून घेता आलं. विज्ञानाचं सतत प्रवाही क्षेत्र माणसाला सतत नूतन ठेवतं. याच विचारांच्या तुषारात मी नाहून निघालो सर्व वाचकांचे आणि ‘सामना’चे आभार मानत मी या सदरापुरती लेखणी थांबवितो, तिला छोटी विश्रांती, विराम देतो.

[email protected]