संशोधकांचे आता ‘मिशन’ गुरू; बर्फाने झाकलेल्या ‘युरोपा’च्या तळाशी सक्रीय ज्वालामुखी, जीवसृष्टीचे मिळताहेत संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरू ग्रहाच्या सर्वात मोठय़ा चंद्रापैकी एक ‘युरोपा’ आहे.  ‘युरोपा’ वर असलेल्या जीवनाबद्दल संशोधकांनी आतापर्यंत बराच अभ्यास केला आहे. मात्र आता त्याहून अधिक महत्त्वपूर्ण माहिती संशोधकांच्या हाती लागली आहे. नव्या अभ्यासानुसार असं समोर आलंय की, ‘युरोपा’च्या 3120 किलोमीटर रुंद समुद्राच्या तळाशी सक्रीय ज्वालामुखी असू शकतो. तसेच पूर्णपणे बर्फाने झाकलेल्या ‘युरोपा’ चंद्राच्या खाली एक विशाल महासागर आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या आधी ‘युरोपा’वर जीकसृष्टी सापडते का, हे बघणे औत्सुकतेचे ठरेल.

‘युरोपा’ अशा ग्रह आणि उपग्रहांपैकी एक आहे जिथे अब्जावधी वर्षांपासून ज्वालामुखीच्या हालचाली असू शकतात. तसेच पृथ्वीप्रमाणे जलसाठा किंवा ऊर्जेचा दीर्घकालीन स्रोत असू शकतो, असे संशोधकांना वाटतेय. संशोधकांच्या मते, या प्रकारचे ज्वालामुखी खोल समुद्रात हायड्रोथर्मल यंत्रणेला बळ देतात. जेणेकरून रासायनिक ऊर्जेने भारलेल्या वातावरणात संभाव्य जीवन फुलू शकतं. चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठाचे प्रमुख मॅरी बोहोनकौकस यांनी सांगितले, ‘युरोपा’ चंद्रावर असलेले समुद्राचे वातावरण जीवनाला पोषक असू शकते.

अमेरिकेची नासा संस्था 2024 साली ‘युरोपा क्लिपर मिशन’ सुरू करणार असून 2030पर्यंत गुरूच्या कक्षेत पोचण्याची शक्यता आहे. ‘युरोपा’चा पृष्ठभाग, तिथले जाड बर्फाळ थर–तुकडे यांची माहिती नासा घेणार आहे. तसेच भविष्यात मिशनसाठी लँडिंग जागादेखील शोधली जाईल.