चला समुद्र सफरीला!

196

अनंत सोनवणे

मालवणचा सिंधुसागर… समृद्ध संपन्न… या सागरी अभयारण्याला भेट देऊया…

महाराष्ट्राला जसा समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभला आहे तसाच अतिशय संपन्न असा तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनाराही लाभला आहे. दुर्दैवानं बऱयाच ठिकाणी आपणच केलेल्या प्रदूषणामुळे या संपन्नतेची रया गेली आहे. तरीही किनारपट्टीवरची काही ठिकाणं आजही सागरी जैवविविधता टिकवून आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातला मालवणचा समुद्रकिनारा त्यात अग्रणी आहे. या किनाऱयालगतचा एक हिस्सा तर समुद्री वन्य जीवांसाठी अक्षरशः नंदनवन आहे. म्हणूनच 3 एप्रिल 1987 रोजी हा परिसर समुद्री वन्य जीव अभयारण्य म्हणून  घोषित करण्यात आला.

हिंदुस्थानातल्या अगदी मोजक्या समुद्री अभयारण्यांपैकी एक आणि  कोकणातलं एकमेव समुद्री अभयारण्य अशी या परिसराची ओळख आहे. मालवण समुद्री वन्य जीव अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे अवघं 29.12 चौ. कि.मी. त्यात कोअर झोन 3.18 चौ. कि.मी. तर  बफर झोन 25.94 चौ. कि.मी. आहे. कोअर झोनमध्ये सिंधुदुर्ग किल्ला, पद्मगड बेट आणि पाण्याखाली गेलेल्या खडकाळ परिसराचा समावेश होतो. बफर झोनची उत्तर-पूर्व सीमा मालवण बंदराजवळच्या समुद्रापासून 50 मीटर अंतरावर आहे, तर पूर्वेला मालवण किनाऱयाला समांतर असा अर्धगोलाकार वालुकामय किनारा आहे. बफर झोनची दक्षिण सीमा मांडेल खडकापर्यंत तर पश्चिम सीमा मालवण खडकापर्यंत पोहोचते.

मालवण समुद्री वन्य जीव अभयारण्य म्हणजे सागरी वन्य जीवांसाठी आदर्श अधिवास आहे. सुमद्रकिनाऱयाजवळ असलेले खडक भरती आणि ओहोटीच्या वेळी पाण्यातून वर येतात किंवा पाण्यात बुडतात. त्यामुळे तिथे वन्य जीवांसाठी उपयुक्त जागा तयार होतात. म्हणूनच मालवणचा समुद्रकिनारा समुद्री वनस्पती, पक्षी व जलचर प्राण्यांसाठी आदर्श ठरतो. या आगळय़ावेगळय़ा अभयारण्यात विविध प्रकारच्या कोरल्याचं अनोखं विश्व पाहायला मिळतं. समुद्री पाणवनस्पती आणि खारफुटी इथं जोमानं वाढलेल्या दिसतात. इथलं प्राणीजीवनही अद्भुत आहे. इथं कालवसारखे मृदू शरीर व अंगावर कवच असणारे Mollusks, पर्ल ऑस्टर्स, गांडुळासारखे दिसणारे Polychaetes, इत्यादी वैशिष्टय़पूर्ण प्राणी पाहायला मिळतात. माशांच्या तर 30 पेक्षा जाती-उपजाती इथं सुखनैव नांदताना दिसतात. त्यात महासीर, शिंगाडासारख्या बाजारात विकल्या जाणाऱया जातींचाही अमावेश आहे. त्याचबरोबर इथं डॉल्फिन आणि विविध प्रकारचे समुद्री सापही पाहायला मिळतात. समुद्राबरोबरच समुद्राच्या आसपासही आपल्याला वन्य जीवांचं निरीक्षण करण्याची संधी मिळते. इथं पांढऱया पोटाचा गरुड, तुतवार, तुतारी, काळय़ा डोक्याचा कुरल, युरेशीयन क्ल्यू, व्हिंबरेल तसंच खास समुद्राकाठी दिसणारे पक्षी पाहायला मिळतात. सभोवारच्या परिसरात बिबटय़ा, रानडुक्कर, निलगाय, भेकर, सांबर इत्यादी वन्य जीवांचाही वावर आहे.

मालवण समुद्री वन्य जीव अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर सुरू असतं. त्यामुळे इथं कधीही भेट देता येते. इथली सोनेरी वाळू आणि सुरूची वानं तुम्हाला मोहात पाडतील. इथली पाण्याखालची अद्भुत दुनिया पाहायला तुम्हाला नक्की आवडेल.

मालवण समुद्री वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…समुद्री वन्य जीवन

जिल्हा…सिंधुदुर्ग

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…29.12 चौ. कि.मी.

निर्मिती…3 एप्रिल 1987

जवळचे रेल्वेस्थानक…कुडाळ (28 कि.मी.)

जवळचा विमानतळ…गोवा (145 कि.मी.)

निवास व्यवस्था…आकेरीत वनविभागाचं विश्रामगृह, अनेक खासगी हॉटेल्स. मालवणमध्ये सर्वाधिक योग्य

हंगाम….वर्षभर.

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही

आपली प्रतिक्रिया द्या