अमृतपाल नांदेडमध्ये? शहरात तीन दिवसांपासून नाकाबंदी, वाहनांची कसून तपासणी

पंजाब पोलिसांना चकवा देऊन पसार झालेला खलिस्तानवादी अमृतपालसिंह हा नांदेडात आश्रयाला आला असल्याचा दाट संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांनी शहरात तीन दिवसांपासून नाकाबंदी केली आहे. शहरात येणार्‍या आणि बाहेर जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनीही नांदेड पोलिसांना यासंदर्भात अलर्ट केल्याचे वृत्त आहे.

पंजाब पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच खलिस्तानवादी अमृतपाल पसार झाला. एका गुरुद्वारात त्याने केस कापले, कृपाण टाकून दिले आणि दुसर्‍याचे कपडे घालून पसार झाला. अमृतपालच्या विरोधात पंजाब पोलीस महासंचालकांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. अमृतपाल हा पंजाबातून निघून थेट नांदेडात आश्रयाला आल्याचा संशय आहे. पंजाब पोलिसांनी यासंदर्भात नांदेड पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच अलर्ट केले होते. त्यामुळे शहरात तीन दिवसांपासून कडक नाकाबंदी लावण्यात आली आहे. शहरात येणारी आणि शहरातून बाहेर जाणारी वाहने तपासण्यात येत असल्याचे परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले. त्याचबरोबर हॉटेल्सचीही झाडाझडती घेण्यात येत आहे. अमृतपालचे नांदेडात कुणाशी संबंध होते का याचाही धांडोळा घेण्यात येत असून, एटीएसनेही आपली यंत्रणा कामाला लावल्याचे वृत्त आहे.