Hindenburg report – सेबीच्या प्रमुख माधवी बूच यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सुडापोटी आमचं…’

सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीने शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा बॉम्बगोळा ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने शनिवारी फोडला. यामुळे उद्योजगतामध्ये खळबळ उडालेली असतानाच आता सेबीच्या प्रमुखांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच आणि त्यांच्या पतीने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे खुली किताब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने 10 ऑगस्ट रोजी आमच्यासंदर्भात केलेले सर्व आरोप निराधार आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून आमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही सेबीकडे सादर केली आहेत. तसेच सेबीच्या प्रमुख होण्यापूर्वीची कागदपत्रेही जाहीर करण्यात आम्हाला संकोच नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सेबीने याआधी हिंडनबर्ग रिसर्च संस्थेवर कारवाई केली असून सुडापोटी आमचे चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अदानीच्या ‘महा’घोटाळ्याची JPC मार्फत सखोल चौकशी करा; हिंडनबर्गच्या गौप्यस्फोटानंतर विरोधक आक्रमक

अमेरिकन कंपनी ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने शनिवारी सकाळी सोशल मीडियात ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली होती. हिंदुस्थानात लवकरच काहीतरी मोठे घडणार, असे कंपनीने जाहीर केले होते. त्या पोस्टने देशातील उद्योगविश्वात अस्वस्थता वाढली होती. याचदरम्यान रात्री नवीन पोस्ट शेअर करून थेट सेबी आणि गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या कनेक्शनची पोलखोल केली. अदानी समूहातील घोटाळय़ात वापर केलेल्या ‘ऑफशोर कंपन्यां’मध्ये सेबीच्या प्रमुख माधवी बूच व त्यांच्या पतीची भागीदारी आहे. याच भागीदारीमुळे सेबीने अदानी समूहाची मागील 18 महिने पाठराखण केली आणि गंभीर आरोपांनंतरही कारवाई केली नाही, असा दावा ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने केला आहे.

हिंडनबर्गने नवा बॉम्ब टाकला, ‘सेबी’प्रमुखच अदानींच्या कंपनीत भागीदार! घोटाळ्याची चौकशी करणारी संस्थाच फुटली