
2022 ची हिंदुस्थानी क्रिकेटचा प्रारंभ निराशाजनक झाला होता. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटीत हिंदुस्थानचा 7 विकेट्सनी पराभव केला होता, परंतु वर्षाचा एण्डिंग हॅपी करण्यासाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 188 धावांनी पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली होती. आता दुसऱया कसोटीतही विजयाची मालिका कायम ठेवत 2-0 च्या विजयाचे ध्येय हिंदुस्थानी संघाने समोर ठेवले आहे.
शर्मापाठोपाठ राहुलही अनफिट?
रोहित शर्माची फिटनेसची कसोटी सुरूच असल्यामुळे दुसऱया कसोटीतही हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व के. एल. राहुलच्या हाती सोपवण्यात आले होते, पण सरावादरम्यान राहुलच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्यावरही विश्रांतीचे संकट आहे. जर राहुल खेळू न शकल्यास उपकर्णधार चेतेश्वर पुजारा नेतृत्व करेल. पण राहुलची दुखापत फारशी गंभीर नसून तो कसोटीत खेळेल, असा विश्वास संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केला आहे. मात्र राहुलला संघाबाहेर बसावे लागल्यास अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. याआधी नवदीप सैनी एकही चेंडू न टाकताच सरावादरम्यान जखमी झाल्याने संघाबाहेर गेला आहे. पहिल्या कसोटी हिंदुस्थानने यश मिळवले असले तरी संघात काही बदल अपेक्षित आहेत, मात्र कुणाला संधी मिळेल याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. चट्टोग्रामला हिंदुस्थानी गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. कुलदीप यादवच्या फिरकीपुढे बांगलादेशने नांगी टाकल्यामुळे हिंदुस्थानला मोठा विजय नोंदविता आला होता. मोहम्मद सिराजनेसुद्धा लक्षवेधी मारा केल्यामुळे त्यांच्या कामगिरीचीही दखल घेतली.
कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने हिंदुस्थानसाठी महत्त्वाचा सामना
कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने ढाका कसोटी खूप महत्त्वाची आहे. या वर्षी झालेल्या सहापैकी तीन कसोटी सामन्यांत हिंदुस्थानला पराभव पचवावा लागला आहे. परदेशात झालेल्या दोन्ही मालिकेत हिंदुस्थान हरला होता. वर्षाच्या प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धक्का बसला तर जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटीत हार पत्करावी लागली. त्यामुळे कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी हिंदुस्थानला बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकणे आवश्यक आहे.
पुजारा ब्रॅडमनना मागे टाकणार
सर डॉन ब्रॅडमन यांच्या 6996 कसोटी धावांना मागे टाकण्यासाठी चेतेश्वर पुजाराला केवळ 13 धावांची गरज आहे. ब्रॅडमन यांनी 52 कसोटींत 6996 धावा केल्या होत्या तर पुजाराला इतक्या धावांसाठी 97 कसोटी सामने खेळावे लागले आहेत. धावांच्या यादीत पुजाराचे स्थान 56 व्या क्रमांकावर आहे. तसेच तो सात हजारांपेक्षा अधिक धावा करणाराही आठवा फलंदाज असेल. त्याच्यापुढे सध्या खेळत असलेला कोहलीच (8094) पुढे आहे. या मालिकेत कोहलीलाही फॉर्म गवसला असून त्यानेही आपल्या शतकाची प्रतीक्षा संपवली आहे. त्यामुळे ढाक्यातही हिंदुस्थानी फलंदाजांची डंका वाजणे अपेक्षित आहे.
























































