अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच! आज दुसरी यादी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील कोटय़ातील प्रवेशामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मुंबईतील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी यादी लांबली. ही यादी लांबल्याने प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ सुरू असून पुढे ढकलण्यात आलेली यादी गुरुवारी जाहीर होणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत मुंबई विभागातून १ लाख २० हजार विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. यापैकी ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे अद्याप दीड लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. पहिल्या यादीत नव्वदहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिल्यामुळे ८० ते ७५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. अल्पसंख्याक कोटय़ाच्या जागांवर अल्पसंख्याक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याक महाविद्यालयांनी ऑनलाइनसाठी दिलेल्या जागा पुन्हा नियमित यादींपर्यंत महाविद्यालयाकडे राहणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कधीपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल याबाबत विद्यार्थ्यांना काहीच कल्पना नसल्याने प्रवेशाचा गोंधळ कायम राहणार हे निश्चित आहे.