
सामना प्रतिनिधी । देवरूख
सांगली येथे पार पडलेल्या 8 व्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने शाळेच्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. राज्यातील 463 प्रकल्पातून राष्ट्रीय स्तरावर जाणारा हा ताम्हानेचा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आठवे राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन सांगली येथे पार पडले. या प्रदर्शनात संपूर्ण राज्यातून 300 पेक्षा अधिक विद्यालयांचे 463 प्रकल्प मांडण्यात आले होते. याच प्रदर्शनात ताम्हाने विद्यालयाचा जिल्हास्तरावरून राज्यस्तरासाठी निवडण्यात आलेला प्रकल्प सादर करण्यात आला होता. आफान अजमेर धामस्कर या विद्यार्थ्याने विज्ञान शिक्षक बाबासाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या शेतकरी मित्र या प्रकल्पाची आज राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली. प्रकल्पात मांडलेल्या लोखंडी दांड्यापासून विविधपयोगी उपकरणाचे उसाचा डोळा काढणे, बीया लागवड करणे, जमिनीतील दगड काढणे, काजु रातांबे काढणे, उंच झाडावरील लहान फांद्या काढणे, पाला पाचोळा गोळा करणे, शेतातील माती सरळ करणे असे विविध उपयोग दाखविण्यात आले.
प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ आज नुकताच पार पडला यावेळी शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे, वनश्री नानासाहेब महाडीक, डॉ अशोक गिरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना गौरविण्यात आले. पुढील महिन्यात होणार्या राष्ट्रीय प्रदर्शनात हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, उपाध्यक्ष विश्वनाथ सावंत, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक नंदकुमार परीट यांच्यासह संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.
तिन जिल्ह्यांच्या प्रदर्शनातून आमचा प्रकल्प राज्यस्तरावर गेला होता त्यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर जाईल याचा विश्वास होता. विद्यार्थी आणि शिक्षकांनी हे काम करून दाखवले आहे. शाळेच्या इतिहासात हा सुवर्णक्षण आहे. ग्रामीण भागातील शाळा राष्ट्रीय पातळीवर जाणे हे अभिमानाचे आहे. – अशोक सप्रे, सचिव, ताम्हाने शिक्षण मंडळ
































































