
काही जणांच्या कथा ह्या इतरांसाठी फार मोलाच्या ठरतात. अशीच एक गोष्ट आहे हरियाणाचे रहिवासी असलेल्या जतीन जाखड याची. त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये १९१ वा क्रमांक मिळवला. हा त्यांचा पाचवा प्रयत्न होता, यापूर्वी तो सलग चार वेळा परीक्षेत नापास झालेला. मिळालेल्या माहितीनुसार, जतीनचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते सैन्यातून निवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. लहानपणापासून जतीनने आपल्या वडिलांना मुलांसाठी स्वतःच्या गरजांचा त्याग करताना पाहिले आहे आणि यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी अथक परिश्रम केले आणि यश मिळवले.
जतीनचा यूपीएससीचा प्रवास सोपा नव्हता. तो परीक्षेत सलग चार वेळा नापास झालेला, तरीही त्याने हार मानली नाही. तयारीदरम्यान त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. जेव्हा त्याने तयारी सुरू केली, तेव्हा त्याला खात्री होती की ते यूपीएससी उत्तीर्ण होतील, पण हा प्रवास सोपा नव्हता. आपल्या चार प्रयत्नांमध्ये तो मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या फेऱ्यांपर्यंत पोहोचला, पण प्रत्येक वेळी अंतिम यादीतून तो वगळला गेला. एक वेळ अशी आली होती की, त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले, पण जतिनने त्याकडे दुर्लक्ष केले, स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि आपल्या कमकुवत बाजूंवर काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पाचव्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि १९१ वा क्रमांक मिळवला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, जतिनने यूपीएससीच्या तयारीसाठी या काळात जवळपास नऊ वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर घालवली. कॉलेजच्या दिवसांपासूनच त्याने अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा दृढनिश्चय होता. यूपीएससीच्या तयारीदरम्यान त्याने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, तसेच सामान्य अध्ययनावर लक्ष केंद्रित केले. त्याने वर्तमानपत्रे, सरकारी अहवाल आणि प्रमुख जागतिक घडामोडींवरही लक्ष ठेवले. त्याने तासन्तास उत्तरलेखनाचा सरावही केला, जो त्याच्या यशाचा मोलाचा पाया ठरला.



























































