सांबा-कठुआमध्ये हाय अॅलर्ट जारी; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

617

जम्मू कश्मीरमधील सांबा-कठुआ जिल्ह्यातील लष्करी चौक्यांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सांबा- कठुआ जिल्ह्यातील लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी लष्करी चौक्या आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

हे दोन्ही जिल्हे हिंदुस्थान- पाकिस्तानच्या सीमाभागात आहेत. या जिल्ह्यात लष्कराची महत्त्वाची ठिकाणे असून जम्मू- पठाणकोट हा महत्त्वाचा महामार्गही याच भागात आहे. सुरक्षा दलाचे मुख्यालय आणि छावण्याही महामार्गाजवळ आहेत. त्यामुळे गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर या भागातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दहशतवादी घुसखोरी करून या महामार्गावर येण्याची शक्यता आहे. याआधाही सांबा, हिरानगर, राजबाग, कठुआ आणि जंगकोट भागात दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात लष्करी ठाणी आणि पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे गुप्तचर विभागाने दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर सीमेपलीकडील हालचाली वाढल्या आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. सुरक्षा दल सतर्क असून दहशतवाद्यांचे डाव हाणून पाडण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या