सोलापूर एनटीपीसीच्या सुरक्षा अधिकाऱयाला लाच प्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षा ठेव परत देण्यासाठी कंत्राटदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेणारा सोलापुरातील एनटीपीसीचा अधिकारी गोविंदकुमार याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. दरम्यान, गोविंदकुमार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

एनटीपीसीअंतर्गत युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड कंपनी असून, या कंपनीकडे ठेकेदार नेमणे व अन्य कामे नेमण्याची जबाबदारी आहे. गोविंदकुमार हा सुरक्षा अधिकारी आहे. सोलापुरातील एका कंत्राटदाराने यू.पी.एल. कंपनीकडे पाच लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती. ही सुरक्षा ठेव परत देण्यासाठी कंत्राटदाराने रितसर अर्ज केला होता. सदरची सुरक्षा ठेव रक्कम देण्यासाठी गोविंदकुमार अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करीत होता. तडजोड होऊन एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी कंत्राटदाराने पुण्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दिली. सीबीआयच्या पथकाने सापळा रचून गोविंदकुमार याला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, घराचीही झडती घेण्यात येत आहे.