
सामना प्रतिनिधी । खेड
गेल्या आठवड्य़ात पोलादपुर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर घाटरस्त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागमोडी वळणांचे अरुंद रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, ही अपघातांची मुख्य कारणे आहेत. मात्र अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने भिषण अपघातांच्या संख्येने दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
वर्षा सहलीसाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांची बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात खोल दरीत कोसळून ३० जणांचा बळी गेला. हा भीषण अपघात अरुंद घाट रस्ता आणि रस्त्याला सुरक्षा कठडा नसल्यामुळे झाल्याचे उघड झाले. जर घाटात रस्त्याला सुरक्षा कठडे असते तर दरीत कोसळणारी बस कठड्याला धडकून थांबली असती आणि ३० दुर्दैवी कर्मचाऱ्यांचे बळी गेले नसते. मात्र जो पर्यंत असा अपघात होत नाही, आठ-दहा जीव जात नाहीत तो पर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही करावेसेच वाटत नसल्याने अशा प्रकारचे अपघात होतच राहणार आहेत.
या अपघातानंतर १९ मार्च २०१३ रोजी जगबुडी पुलावर झालेल्या अपघाताची आठवण ताजी झाली. १९ मार्च २०१३ च्या पहाटे खेड तालुक्यातील जगबुडी पुलाचा कमकुवत कठडा तोडून महाकाली ट्रॅव्हल्सची बस थेट नदीपात्रात कोसळली होती. या अपघातात ३७ जणांना बळी गेला तर कित्येकजण जखमी झाले होते. कमकुवत झालेल्या जगबुडी पुलाची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी चालक आणि प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. मात्र या मागणीकडेही असेच दुर्लक्ष झाले आणि एकाच वेळी ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
या नंतरचा आणखी एक भीषण अपघात म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीपुल. ३ ऑगस्ट २०१६ ची ती काळरात्र आजही आठवली तरी अंगावर शहारे येतात. ३ ऑगस्टच्या मध्यरात्री सावित्री नदीवरील पुल अचानक कोसळला आणि दोन एसटी बसेस व एका तवेरा कारला जलसमाधी मिळाली. या अपघातात २९ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सावित्री नदीवरील पुल कमकुवत झाल्याची कल्पना संबधित खात्याला नव्हती असे नाही मात्र या पुलाबाबतीही दुर्लक्ष झाले आणि नियतीच्या एका फटकाऱ्याने २९ जणांची कुटुंब उद्धवस्त झाली.
मागील दहा वर्षात मुंबई – गोवा महामार्गावर झालेल्या अपघातांचा मागोवा घेतल्यास या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये शेकडो निरापराध प्रवाशांचा बळी गेला आहे. यातील बहुतांशी अपघात हे घाट किंवा धोकादायक पुलावर झालेले आहेत. धोकादायक पुलांची डागडुजी करणे तसेच घाटातील रस्त्यांची रुंदी वाढवून रस्त्याला संरक्षक कठडा बांधणे अतिशय गरजेचे आहे. परंतु या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने जीवघेणे अपघात कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत.
मुंबई गोवा महामार्गासह, कोकणातून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या घाटरस्त्यांवर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. यामध्ये भोर आणि आंबेनळी घाटाचा उल्लेख करता येईल. घाटात दरड कोसळली की प्रवाशांना अडकून पडावे लागते. त्यामुळे घाटातून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आता त्यात खड्डय़ांचीही भर पडली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्य़ांमुळे प्रवाशांना आदळत आपटत प्रवास करावा लागत असून खड्ड्य़ांमुळे अपघाताचाही धोका वाढला असल्याने प्रवास करताना प्रवाशांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे.





























































