आपल्याच सरकारवरील विश्वास उडाला, आमदाराने स्वत:च्या सुरक्षेसाठी तिरंदाज नेमले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचाच आपल्या सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे या आमदाराने स्वत:च्या सुरक्षेसाठी तिरंदाज नेमले आहे. हे तिरंदाज घेऊनच हा आमदार पावसाळी अधिवेशनासाठीही हजर झाला. विधानसभेच्या आवारामध्ये तिरंदाज घेऊन आलेल्या या आमदाराचे नाव लोबिन हेम्ब्रम (Lobin Hembram) असे आहे.

लोबिन हेम्ब्रम हे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार आहेत. बोरियो विधानसेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हेम्ब्रम यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या सुरक्षेमध्येही कपात करण्यात आली होती.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हणत विधानसभा अध्यक्ष रबींद्रनाथ महतो यांच्याकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. 15 दिवसांच्या आत सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी गृहमंत्र्यांनी त्यांना एक्स श्रेणीची सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी स्वत:च तिरंदाज हाती असलेल्या सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. विधानसभेच्या आवारामध्ये त्यांच्यासोबत तिरंदाज दिसत असून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याबाबत बोलताना लोबिन हेम्ब्रम म्हणाले की, मी राज्याच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र सरकारकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती. विधिमंडळातही याबाबत आवाज उठवला होता, परंतु अद्याप माझी सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही. माझ्या घराजवळची सुरक्षाही काढून टाकली आहे.

सुरुवातीला आमदारांच्या सुरक्षेसाठी पाच ते सहा सुरक्षारक्षक असायचे. मात्र अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून माझ्या जिवाला धोका असतानाही मला फक्त तीन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. ही सुरक्षा पुरेशी नसल्याने आपण तिरंदाज नेमल्याचे हेम्ब्रम यांनी सांगितले.