कळंब तालुक्यातील नागझरवाडीत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप

659

कळंब तालुक्यातील नागझरवाडी येथील गुरु गुलाब गिरी शेतकरी बचतगट आणि बळीराजा शेतकरी बचतगटाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुमारे 25 टन खताचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत शेतकऱ्यांना शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून बांधावर खत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि बचत गटांना तसे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या या आवाहनाला प्रतीसाद देत नागझरवाडी येथील गुरू गुलाब गिरी आणि बळीराजा शेतकरी बचतगटाने 25 टन खताच्या निविष्ठांची आत्तापर्यंत खरेदी करून शेतकऱ्यांच्या बांधावर खतांचे वाटप केले आहे. या वेळी सोशल डिस्टसिंग पाळण्यात आले.

या खत वाटपाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मागदर्शन करताना कृषी सहाय्यक भुजंग लोकरे म्हणाले की, सध्या सोयाबीन बियाणांची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीनचे बियाणे वापरावे. हे बियाणे वापरताना उगवणक्षमता तपासणी करूनच बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवणक्षमता 70 टक्के असेल तर एकरी 30 किलो बियाणे वापरावे. तसेच 60 टक्क्यांपेक्षा कमी उगवणशक्ती असेल तर ते बियाणे वापरू नये. उगवणशक्ती कमी होण्याची कारणे सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यापुळे एक वर्षावर साठवणूक केलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवाय पेरणीस वापरू नये. साठवणुकींमध्ये पाोत्यांची एकमेकांवर थप्पी लावल्यास खालच्या पोत्यातील बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. म्हणून जास्तीत जास्त 5 पोत्यांची थप्पी असावी. सोयाबीनची उगवणशक्ती 70 टक्क्यांवर असल्यास हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे असे सांगितले. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना असे अवाहन केले की प्रत्येकाने बाजारात जाऊन गर्दी करण्यापेक्षा गटाच्या माध्यमातून खरेदी करावी. जेणेकरून बाजारातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांनी गटाला मार्गदर्शन करून मोठी मदत केली. यावेळी बापू वाघ, सचिन साळुंके, बाबासाहेब माने , अजित साळुंके, विठ्ठल यादव, विलास शेळके, सतिष लबाड, योगेश साळुंके, विकास साळुंके सह गटाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या