कराडजवळ 82 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; ट्रक, मोटारीसह तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड तालुक्यातील नारायणवाडी गावच्या हद्दीत 82 लाखांची अवैध गोवा बनावटी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ट्रक, मोटार, 4 मोबाईलसह तिघांना ताब्यात घेतले.

रामजी चंद्रकांत होनमाने आणि मुस्ताक मुबारक नदाफ (दोघेही रा. जयभवानीनगर, आटपाडी, जि. सांगली) यांच्यासह अन्य एकजण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीहून कराडच्या दिशेने जाणाऱया ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 11,088 सिलबंद बाटल्या, 750 मि.ली.च्या 948 सिलबंद बाटल्या, बिअरचे 500 मि.ली.चे 2400 कॅन तसेच एक चौदा चाकी मालवाहू ट्रक, एक चारचाकी वाहन, गुह्यातील अवैध मद्यसाठा लपविण्यासाठी वापलेल्या भुश्याच्या 45 गोण्या, 4 मोबाईल संच असा एकूण 82 लाख पाच हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सातारा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहायक दुय्यम निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सचिन खाडे, अजित रसाळ, भीमराव माळी, सचिन जाधव, मुनिजा मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली. निरीक्षक संजय साळवे तपास करीत आहेत.