एक बहुगुणी कुंचला निमाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  शिरीष कणेकर

रात्री उशिरा एका मित्राचा फोन आला… तो एवढंच म्हणाला, ‘विकास सबनीस गेला.’ ही बातमी येऊ नये अशी खूप इच्छा होती, पण त्याचबरोबर ती लवकरच व वेळीअवेळी येणार अशी भीतीही वाटत होती. भीती खरी ठरली. एक त्रासलेला जीव मुक्त झाला. एका कुशल व प्रतिभावान व्यंगचित्रकाराला आपण मुकलो. शेवटच्या काही महिन्यांत त्यानं व्यंगचित्र काढणं थांबवलं होतं, अन्नपाणी वर्ज्य केलं होतं. त्याचा आवाज फुटत नव्हता. डोळय़ांसमोर तो तीळतीळ झिजत होता. त्याला नक्की काय झालंय हे त्याच्या डॉक्टरांनाही कळत नव्हतं. आम्ही मित्रांनी त्याच्या खचलेल्या मनाला उभारी देण्याचे अथक प्रयत्न केले, पण तो ऐकल्यासारखं दाखवतदेखील नव्हता. तो त्याच्याच विश्वात असायचा. आम्हाला तिथं प्रवेश नव्हता. त्यानं व्यंगचित्र काढणे सोडलं तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. व्यंगचित्र हे त्याचं जीवन होतं. व्यंगचित्रापासून फारकत म्हणजे जीवनापासून फारकत. व्यंगचित्रांशिवाय त्याला वेगळं अस्तित्वच नव्हतं. ते संपणं म्हणजे अस्तित्वच संपण्यासारखं होतं. थोडय़ाच दिवसांत ते संपलं.

सदैव विनोदाच्या जगात राहणारा हा माणूस तोंडानं कधीही विनोद करायचा नाही की दुसऱयाच्या विनोदावर हसायचा नाही. हे लोकविलक्षण होतं. केवळ हातात कुंचला आला की, तो विकास सबनीस व्हायचा. तो कुंचल्यानं बोलायचा. त्याचं एक व्यंगचित्र मी कधीही विसरणार नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यानं ते काढलं होतं. महात्मा गांधी व इंदिरा गांधी ढगावर आरूढ झालेत व इंदिराजी म्हणतायत, ‘बापू, तुमच्या काळानंतर देशानं खूपच प्रगती केलीय, आपण पिस्तुलापासून मशीनगनपर्यंत आलोय…’

फोन करून त्याच्या व्यंगचित्राला दाद दिली की, तो विलक्षण सुखवायचा व त्यातून उतराई होण्यासाठी अतिशयोक्ती अलंकाराचा आसरा घेत तो स्तुतीसुमने उधळायचा. इतकी की आपण गुदमरून जावं. तो कुंचल्यानं बोलत असल्यानं असेल बहुधा, बोली शब्द त्याच्याशी लपंडाव खेळायचे. तो बोलायचा ते त्याला म्हणायचं नसायचं व तो म्हणायचा ते त्याला बोलायचं नसायचं. त्यामुळे तो सहसा भांबावल्यासारखा वाटायचा. माणसांना भेटण्यापेक्षा त्यांना टाळण्याकडे त्याची सहज प्रवृत्ती होती. समोरच्यानं हटकलंच तर विकासचा नाइलाज व्हायचा व मग तो कुंभमेळय़ात हरवलेल्या दोन भावांनी दोन तपानंतर भेटावं तसा तो उराउरी भेटायचा. आधीची अलिप्तता व आत्ताचं अगत्य यांची समोरच्याला सांगड घालता येत नाही. सगळा सावळागोंधळ. असंबद्ध सुखसंवाद सुरू होतो. त्यानंतर मिठाचा सत्याग्रह करायला निघालेल्या महात्मा गांधींसारख्या लांब लांब टांगा टाकत विकास ताड ताड चालू पडायचा.

त्याला त्याच्या ताडमाड उंचीचा अनाकलनीय ‘काँप्लेक्स’ होता. ‘विकास…’ मी एकदा त्याला म्हणालो, ‘मला माझ्या नसलेल्या उंचीचा न्यूनगंड नाही, तर तुला तुझ्या असलेल्या उंचीचा का असावा?’

मात्र एकदा त्यानं ‘गोष्टी व्यंगचित्रां’च्या या एकपात्री कार्यक्रमात स्वतःचं व्यंगचित्र म्हणून कागदावर वरपासून खालपर्यंत लांबच लांब रांगा काढल्या होत्या. दुर्दैवानं हा खिलाडूपणा त्याला नेहमीच दाखवता आला नाही.

‘मध्यम उंचीची माणसं खोऱयानं पडलीत.’ मी विकासला म्हणालो, ‘तुझ्या बोटातली गंमत त्यातल्या एकाकडे तरी आहे का? देवाच्या या देणगीबद्दल तू ऋणी असायला हवे. विकास सबनीस म्हणून तुला लोक ओळखतात. आणखी काय पाहिजे?’

काही समकालीन व्यंगचित्रकारांची कामं बघताना जाणवतं की, यांचा सगळा विनोद, उपरोध, टीका ही व्यंगचित्राखालच्या ‘कॅप्शन’मध्ये एकवटलीय. व्यंगचित्रांची गरजच नाही. विकास सबनीसचे असे नव्हते. त्याची व्यंगचित्रे व ‘कॅप्शन’ परस्परांना पूरक असत. किंबहुना बहुसंख्य व्यंगचित्रांना ‘कॅप्शन’ची गरज नसे. त्याला जे काही सांगायचंय ते सांगायला त्याची व्यंगचित्रे समर्थ होती. हे विकासचे सर्वात मोठे यश होते. केवळ व्यंगचित्रांवर गुजराण करणारा तो बहुधा एकमेव व्यंगचित्रकार होता. नॉट अ स्मॉल अचिव्हमेंट!

व्यंगचित्रे सोडून त्याला काहीच जमले नाही. व्यंगचित्रे खपवण्यासाठी लागणारी चापलुसकीही त्याच्यापाशी नव्हती. एक संपादक काही अनाकलनीय कारणानं त्याला म्हणाले, ‘आता वर्षभर तरी पुन्हा येऊ नका.’ विकासच्या अंगाची लाही लाही झाली. त्यानंतर तो त्या वृत्तपत्राची पायरीही चढला नाही. अशी दारं बंद करून त्यानं स्वतःला कोंडून घेतलं. तो जास्त कोशात गेला. आम्ही भेटलो की तो मनातल्या उद्वेगाला वाट मोकळी करून द्यायचा. मी काय बोलणार? मी त्याच पारडय़ात होतो. ‘माथेफिरू’ हा शिक्का आम्ही कपाळावर मारून घेतला होता.

विकास कुठेही – अगदी नाटय़गृहात किंवा उसाच्या रसाच्या गुऱहाळात – भेटला तर आश्चर्य व आनंद वाटल्याचा बटबटीत अभिनय करीत म्हणायचा, ‘अलभ्य लाभ! अलभ्य लाभ…’

‘अलभ्य काय त्यात, परवा तर भेटलो होतो’ हे उत्तर देणं मी टाळायचो. आपल्या प्रश्नातला फोलपणा त्याला कळत नसेल का? कळत असेलही, पण ऐनवेळी त्याला पर्यायी शब्दयोजना सुचत नसावी. घराच्या कोपऱयावर असलेल्या स्मशानाकडे बोट दाखवत तो अलीकडे खोल गेलेल्या आवाजात म्हणायचा, ‘ते खुणावतंय मला.’

आपण सगळेच जाणार आहोत, शेवटी तिकडेच विकास गेला. आता कोणीही ‘अलभ्य लाभ’ म्हणालं की हटकून मला विकास सबनीस आठवेल. त्याचा ‘व्हॉट्स ऍप’च्या ‘डी.पी.’वरचा व्यंगचित्र काढतानाचा फोटो आठवेल, त्याची असंख्य व्यंगचित्रे आठवतील, त्याचा उद्रेक व ते फटकन् गप्प बसणे आठवेल. त्याला होणाऱया यातना आठवतील आणि ‘कणेकरसाहेब, आत्ता आलेलं चालेल का?’ ही फोनवरची विचारणा आठवेल. मात्र यापुढे मी ‘ये ना विकास, ये’ असं म्हणू शकणार नाही.