
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नय्यर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुलदीप नय्यर हे आजारीच होते. उपचारासाठी त्यांना अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी एक वाजता लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड, भाकपचे सचिव डी. राजा, काँग्रेसचे नेते मीम अफजल, नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश आदींची उपस्थिती होती.
14 ऑगस्ट 1923 रोजी कुलदीप नय्यर यांचा सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे जन्म झाला. लाहोर येथील फोरमॅन कॉलेजातून त्यांनी पदवी घेतली. नॉर्थवेस्ट विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला ते उर्दू वर्तमानपत्रात वार्तांकनाचे काम करत. इंग्रजी वर्तमानपत्र द स्टेटस्मनचे ते संपादक झाले. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले. पत्रकारितेबरोबरच त्यांनी सामाजिक सौहार्दासाठीही काम केले. 1990 मध्ये त्यांची ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रात पाठवण्यात आलेल्या हिंदुस्थानी शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. 1997 मध्ये त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. कुलदीप नय्यर हे 14 भाषांमधील 80 वर्तमानपत्रांसाठी स्तंभलेखन करत.
सीमेवर शांततेचा संदेश
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सौहार्दाचे वातावरण असावे यासाठी 2000 पासून ते अटारी तसेच वाघा सीमेवर शांतताप्रेमींसह मेणबत्ती मार्च काढत असत. पाकिस्तानी कारागृहात खितपत पडलेल्या हिंदुस्थानी नागरिकांसाठीही त्यांनी आवाज उठवला. कुलदीप नय्यर यांची 15 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.



























































