वैद्यकीय हलगर्जीपणाच्या गुन्ह्यांसाठी स्वतंत्र सेल हवे; हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपचारादरम्यान डॉक्टरांकडून काही हलगर्जीपणा झाल्यास अथवा गुन्हा घडल्यास त्याच्या तपासासाठी स्वातंत्र्य सेल हवे. जेणेकरून त्या क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण असलेले पोलीस योग्य तपास करतील अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्या.

कोविडशी संबंधित विविध समस्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी हायकोर्ट म्हणाले की अशा घटनांमध्ये पोलिसांनाही त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान व माहिती हवी तसेच कायद्यांचीही जाण हवी.

सायबर क्राईमविषयी सायबर सेल, आर्थिक गुन्ह्यांसाठी ईओडब्ल्यू, अंमली पदार्थ गुन्ह्यांविषयी एनसीडब्ल्यू हे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. तशाच प्रकारे वैद्यकीय हलगर्जीपणांच्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्या क्षेत्रातील ज्ञान व विशेष प्रशिक्षण असलेल्या पोलिसांचा स्वतंत्र विभाग असायला हवा. जेणेकरून डॉक्टरांविरोधातील तक्रारी इतर दुसऱया कोणत्याही पोलिसांकडे जाणार नाहीत. त्यामुळे वैद्यकीय हलगर्जीपणाच्या गुह्यांसाठी स्वतंत्र सेल तयार करण्याबाबत निर्णय घ्या व त्याची माहिती कोर्टाला द्या असे स्पष्ट करत हायकोर्टाने सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब केली.