नऊ वर्षांपूर्वीच ‘या’ चित्रपटात दाखवला होता कोरोनासारखा हाहाकार, आता येणार सिक्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नावाच्या राक्षसाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे जग वेठीला धरलं गेलं आहे. पण, जगावर ही परिस्थिती आली तर काय होऊ शकतं, याचं चित्रण करणारा एक चित्रपट नऊ वर्षांपूर्वीच येऊन गेला होता. आता त्या प्रसिद्ध चित्रपटाचा सिक्वल येऊ घातला आहे.

हा चित्रपट म्हणजे स्टीव्हन सोडरबर्ग दिग्दर्शित कॉन्टॅजिन. 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली होती. एखादा संसर्गजन्य आजार जर अनेक देशांमध्ये पसरला तर जगाची काय अवस्था होईल, ते त्यात दर्शवण्यात आलं होतं. योगायोगाची गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये हा रोग पसरण्याचं कारण डुक्कर किंवा वटवाघुळाचं मांस दाखवण्यात आलं होतं.

contagion-1

तसंच, संसर्गजन्य आजारामुळे पसरलेली मरणकळा, त्यामुळे बिघडलेलं अर्थचक्र, वेठीला धरलं गेलेलं सामान्य माणसाचं आयुष्य असं सगळंच त्या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. योगायोगाने 9 वर्षांनंतर साधारणतः अशीच परिस्थिती सगळ्या जगावर आली आहे.

त्यामुळे कोरोना लॉकडाऊन काळातही हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला होता. आता त्या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच येणार आहे. एका मुलाखतीदरम्यान सोडरबर्ग यांनी याचा खुलासा केला आहे. त्यांच्यासह स्कॉट बर्न्स या चित्रपटावर काम करत आहेत. हा सिक्वल काहीसा तत्वज्ञानाकडे झुकणारा असेल, तसंच संहितेतही बरेच बदल होणार आहेत, अशी माहिती सोडरबर्ग यांनी दिली आहे.