
कोरोनाने इतका भीषण अवतार धारण केल्यानंतरही मास्क घालणे काहींच्या आजही पचनी पडत नाही. असेच सर्व नियम फाटय़ावर मारून क्रिकेट खेळणाऱया एका 20 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आपला हिसका दाखवून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. याविरोधात सत्र न्यायालयात धाव घेणाऱया या तरुणाला न्यायालयानेही खडे बोल सुनावत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कुरेशी हा आपल्या सहा मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. तितक्यात तिथे आलेल्या पोलिसांना पाहून या सर्वांनी पळ काढला खरा, पण त्यांचे मोबाईल मात्र तिथेच राहिले. अखेर मोबाईल घेण्यासाठी या सर्वांना पोलीस ठाण्यात यावेच लागले. तिथेही यांनी पोलिसांसोबत वाद घातला.
एकाने पोलिसाच्या हातून मोबाईल हिसकवण्याचाही प्रयत्न केला, यावेळी झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचाऱयास दुखापतही झाली. तेव्हा पोलिसांनी कुरेशीसह त्याच्या मित्रांविरोधात जमावबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी व पोलीस कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर, पोलिसांकडू मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करणारा कुरेशीचा मित्र हा अल्पवयीन असल्याने, सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आले. इतर सर्व फरार झाले. कुरेशीला अटक करून न्यायायलयीन कोठडीत ठेवण्यात आलं.
कठीण काळातही नियमांचे पालन नाही
या प्रकरणात दंडाधिकाऱयांकडून कुरेशीला जामीन नाकारल्या गेल्यानंतर त्याने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजीत नांदगावकर यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी करेशीच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकल्यानंतर, न्याधीश नांदगावकर म्हणाले, आरोपीची कठोर नियम व अटींवर मुक्तता करण्यात आली तरीही त्याने सध्याच्या कठीण काळातही शासकीय नियमांचे पालन केले नाही, ही बाब विसरण्यासारखी नाही.
मास्क न घालता रस्त्यात क्रिकेट खेळल्याबद्दल त्याच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य व कादेशीर आहे. आरोपी जर 20 वर्षांचा असल्याने त्याला सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती असेल. असं म्हणत सत्र न्यायालयाने आरपीचा जामीन फेटाळला.


























































