
कथित प्रेमसंबंध असलेल्या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मिंधे गटाचे खासदार राहुल शेवाळे आता दाऊद कनेक्शनमुळे मोठय़ा अडचणींत सापडले आहेत. दाऊद इब्राहिम कनेक्शनवरून शेवाळे यांच्याविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणाऱया याचिकेची सोमवारी प्रधान सत्र न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी गंभीर दखल घेतली आणि या प्रकरणात तातडीने सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
खासदार राहुल शेवाळे यांच्या दाऊद कनेक्शनबाबत मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्याबाबत निर्देश द्या, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी 26 डिसेंबरला एका तक्रारीतून मुंबई सत्र न्यायालयाकडे केली आहे. प्रेमसंबंध असलेल्या महिलेने राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला. त्यामुळे पायाखालची वाळू सरकताच शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या महिलेचे दाऊद कनेक्शन उघड केले. शेवाळे यांनी स्वतःच केलेल्या खुलाशाच्या आधारे त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भालेकर यांनी केली. सोमवारी त्यांची याचिका प्राथमिक सुनावणीसाठी आली त्या वेळी प्रधान सत्र न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी राज्य सरकारला पुढील दोन दिवसांत ‘लिगल एड’मार्फत सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. या माध्यमातून न्यायालयाने तातडीच्या सुनावणीचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे शेवाळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
याचिकेत नेमके काय म्हटलेय…
राहुल शेवाळे यांनी खासदारसारख्या जबाबदार पदावर असताना दाऊद इब्राहिम संदर्भातील माहिती पेंद्रीय तपास यंत्रणा किंवा मुंबई पोलिसांना का दिली नाही? त्यांनी लपवाछपवी का केली? राहुल शेवाळे दुबईला किती वेळा गेले? तेथे ते कोणाकोणाला भेटले? दाऊद टोळीतील कोणकोणत्या सदस्यांसोबत भेट झाली? यासंदर्भात मुंबई पोलिसांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भालेकर यांनी याचिकेतून केली आहे.



























































