‘आयएसएस’, ‘आयईएस’ आणि ‘सेट’ एकाच दिवशी, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षाकोंडी

467

स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर आणि मास्टर्स झालेल्या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी परीक्षाकोंडी झाली आहे. यूपीएससीकडून घेण्यात येणाऱया इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (आयएसएस), इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस (आयईएस) आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यूजीसी मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) या एकाच दिवशी होणार आहेत. या तीनही परीक्षांना बसणाऱया राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून एकाच दिवशी परीक्षा कशी द्यायची या चिंतेत विद्यार्थी सापडले आहेत.

सेट परीक्षा 28 जूनला तर आयएसएस आणि आयईएस या परीक्षा 26 ते 28 जून या तीन दिवशी होणार आहे. सेट परीक्षेतून सहाय्यक प्राध्यापक बनण्याची स्वप्नं पाहणारे राज्यातील अनेक विद्यार्थी आयएसएस किंवा आयईएस परीक्षांच्या माध्यमातून देशपातळीवरही चमकदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतात, पण तारखांच्या घोळामुळे या परीक्षांना बसू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेपासून वंचित रहावे लागण्याचीच चिन्हे आहेत.

स्टॅटिस्टिक्ससाठी प्राध्यापकांची कमतरता

आतापर्यंत आयएसएस परीक्षेत राज्यातील एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. स्टॅटिस्टिक्स या विषयासाठी प्राध्यापकांची कमतरता असतानादेखील सेट आणि आयएसएस या दोन्ही परीक्षा ऐकाच वेळी ठेवण्यात आल्याने या विषयाला राज्यात भविष्य नाही हे दाखवून देण्यात आल्याची टीका विद्यार्थी करीत आहेत. त्याचबरोबर सेट परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात काही विद्यार्थी पुणे विद्यापीठाशी संपर्क साधत आहेत त्यांना पुढील वर्षी परीक्षा देण्याचे उपदेश विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा केंद्रासाठी सेट परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करीत असून या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

आतापर्यंत सेटची परीक्षा वर्षातून दोनदा होत होती, पण मागील जून महिन्यापासून वर्षातून एकदाच परीक्षा होत आहे.

आयएसएस परीक्षेसाठी स्टॅटिस्टिक्स या विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे तर इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स झालेले विद्यार्थी आयईएस परीक्षेसाठी पात्र आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या