मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी सतराशे उमेदवार रिंगणात! 453 जणांनी अर्ज घेतले मागे -आज चिन्हवाटप

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या 2 हजार 182 जणांपैकी आज 453 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता 1 हजार 700 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांची अंतिम यादी उद्या 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून उद्याच सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना चिन्हवाटप सुरू केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर 23 डिसेंबर 2025 पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात करण्यात आली.

अर्ज सादर करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. तर 31 डिसेंबर रोजी छाननी तर 2 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. यानुसार 227 जागांसाठी वैध अर्ज ठरलेल्या एकूण 2182 अर्जांपैकी 453 जणांनी दोन दिवसांत अर्ज मागे घेतले.

प्रभागनिहाय उमेदवार

ए, बी आणि ई – 92

सी, डी विभाग – 44

एफ दक्षिण – 50

जी दक्षिण – 51

जी उत्तर – 109

एफ उत्तर – 93

एल विभाग – 76

एल विभाग – 74

एम पूर्व – 121

एम पूर्व, एम पश्चिम – 97

एन विभाग – 88

एस विभाग – 70

टी विभाग – 79

एच पूर्व – 87

के पूर्व, एच पश्चिम – 58

के पश्चिम – 82

के पश्चिम विभाग -104

पी दक्षिण विभाग – 56

पी पूर्व विभाग – 81

पी उत्तर – 60

आर दक्षिण – 83

आर मध्य – 35

आर उत्तर – 39

एकूण – 1700

164 उमेदवारी अर्ज बाद

23 डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्यास सुरुवात झाल्यानंतर 11 हजार 391 अर्जांची विक्री झाली होती. मात्र केवळ 2182 अर्ज सादर करण्यात आले होते. यातील 164 उमेदवारी अर्ज बाद ठरले.