भाजपचा सातव्या टप्प्यातील प्रचार गॅसवर; जिथे मोदींच्या सभा तिथे शेतकऱ्यांचे आंदोलन

गेल्या तीन महिन्यांपासून शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले शेतकरी लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक असताना प्रचंड आक्रमक झालेले आहेत. पंजाबमध्ये मोदींना घेरण्याचा निर्णय शेतकऱयांनी घेतला आहे. त्यामुळे भाजपचा सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आता गॅसवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा पटियाला, जलंधर आणि गुरदासपूर येथे होत असून आज पटियाला येथे झालेल्या सभेवेळी पंजाबमध्ये ठिकठिकाणी मोदींच्या विरोधात शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारला त्यांच्या मागण्यांची आणि आंदोलनादरम्यान शेतकऱयांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली.

सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात पंजाबमध्येही लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमध्ये एकूण तीन सभा होणार आहेत. आज पटियाला येथे सभा झाली, तर उद्या शुक्रवारी गुरदासपूर आणि जलंधर येथे मोदींच्या सभा होणार आहेत. आज पटियाला येथे मोदींची सभा झाली. या सभास्थळापासून 10 किलोमीटर अंतरावरच शेतकऱयांना अडवण्यात आले. जागोजागी मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आले. दिल्लीमध्ये जाण्यापासून ज्याप्रकारे शेतकऱयांना रोखण्यात आले होते. त्याचप्रमाणे पटियालामध्ये मोदींच्या सभास्थळी जाण्यापासूनही रोखण्यात आल्याचे आंदोलनकर्त्या शेतकऱयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पटियाला-राजापुरा रोड  जनतेसाठी बंद करण्यात आला होता.

साडेपाच हजार पोलीस कर्मचारी तैनात

मोदींची पंजाबमध्ये एण्ट्री होताच शेतकरी आणखी आक्रमक झाले. अर्धा तास मोदींविरोधात घोषणाबाजी सुरू होती. सभास्थळी आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी तब्बल साडेपाच हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी पटियाला शहरात तैनात करण्यात आले आहेत. ज्या पोलो ग्राऊंडमध्ये मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभास्थळाच्या आसपासचे चार रस्ते सर्वसामान्य जनतेसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. सभास्थळी केवळ सिक्युरिटी पासेस असणाऱयांनाच सोडण्यात येत होते.

या आहेत शेतकऱयांच्या मागण्या

– शेतमालाला किमान हमीभाव

– डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य कराव्यात तसेच शेतकऱयांना महिन्याला 10 हजार रुपये भत्ता देण्यात यावा. दरम्यान, मोदींच्या सभांच्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करणार म्हटल्यावर सत्ताधाऱयांची गाळण उडाली, त्यामुळे मोदी सरकारने सभास्थळी आंदोलन करण्याचा सल्ला शेतकऱयांना दिला.

– शंभू बॉर्डरवर बळाचा वापर करून रोखल्याप्रकरणी हरयाणा सरकारचाही शेतकऱयांनी निषेध केला आहे.

आंदोलनाला 100 दिवस पूर्ण

पंजाब आणि हरयाणा सीमा जोडणाऱया शंभू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाला तब्बल 100 दिवस पूर्ण झाले, परंतु मोदी सरकारने अद्याप शेतकऱयांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. या आंदोलनादरम्यान 22 शेतकऱयांचा मृत्यू झाला. आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने  प्रचारसभांदरम्यान शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पटियाला प्रशासनाने शेतकऱयांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. पोलो ग्राऊंडच्या आसपास आंदोलनकर्त्यांना भटकण्यास मनाई करण्यात आली.