
सामना ऑनलाईन, धुळे
शहरात पांझराकिनारी असलेल्या कालिका देवी मंदिराजवळील पुलाखाली मोठय़ा प्रमाणात सांडपाणी साचले आहे. नाल्यावर उभारावा तसा पूल उभारून आमदार गोटे यांनी येथे समस्या निर्माण केली आहे. यापासून पुढे कुमार नगर वसाहत आहे. दोन दिवसांपूर्वी या वसाहतीतील शाळकरी मुलाचा डेंग्युमुळे मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करीत शिवसेना पदाधिकाऱयांनी समस्या निर्माण करणाऱया ठिकाणाची पूजा केली. तसेच शहरातील ऐंशी फुटी रोडवर गटार तुंबली असून सांडपाण्याने रस्त्याचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे निवासस्थान आहे.
शहरात गेल्या काही आठवडय़ांपासून डेंग्यूची साथ पसरली आहे. याशिवाय मलेरिया आणि फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या मोठी आहे, असे असूनही शहरातील सार्वजनिक आरोग्याबाबत आणि स्वच्छतेबाबत आरोग्य विभाग सुस्त आहे. सर्वच भागांतील खासगी दवाखान्यांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी उपरोधात्मक आंदोलन केले. पांझरा किनारी कालिका देवी मंदिराजवळ सांडपाण्याचे डबके साचले आहे. याच ठिकाणी आमदार गोटे यांनी पाइप टाकून पूल उभारला आहे. हा पूल उभारताना नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठय़ा प्रमाणात डबके साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
या डबक्यापासून काही अंतरावर कुमार नगर वसाहत आहे. दोन दिवसांपूर्वीच कुमार नगरातील शाळकरी मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्वत्र युद्ध पातळीवर काम सुरू करणे अपेक्षित होते. पण, आरोग्य विभाग सुस्त आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी उपरोधात्मक आंदोलन केले.
नदीपात्रातील डबक्याचे पूजन केले आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला सुबुध्दी सुचावी अशी प्रार्थना केली. कुमार नगर परिसरात आजही 318 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आहे. काही जणांना चिकनगुनिया आढळला आहे. तरीही महापालिका दखल घेत नाही. नागरिकांचा उद्रेक होण्याची वाट महापालिकेने पाहू नये, असा इशारा महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धिरज पाटील, माजी नगरसेवक भरत मोरे, विश्वनाथ खरात, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, संजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्याखाली अंधार
शहरातील ऐंशी फूट रुंद रस्त्यावर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्याची काळजी वाहणाऱया निरामय हॉस्पिटलच्या समोरच गटार तुंबली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सांडपाणी पसरले आहे. परिणामी, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी तुडवत अनेकांना घरापर्यंत पोहोचावे लागत आहे. विशेष म्हणजे गटार तुंबलेल्या ठिकाणापासून पंचवीस मीटर अंतरावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे निवासस्थान आहे.


























































