
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लग्नाचे खोटे वचन देऊन महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. छत्तीसगडच्या बिलासपुरच्या एका डॉक्टरची याचिका फेटाळत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. छत्तीसगडचे डॉक्टर अनुराग सोनी याने एका तरुणीला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आणि नंतर हे वचन न पाळल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेतली. लग्नाचे खोटे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे आयपीसी ९० नुसार गुन्हा असल्याचे कोर्टाने म्हटले.
डॉ. अनुरागचा पीडितेशी लग्न करण्याचा कुठलाच हेतू नव्हता. त्याने फक्त शारीरिक वासनेपोटी पीडितेला खोटे वचन दिले हे खटल्यात सिद्ध झाले. जर डॉ. अनुरागने लग्नाचे वचन दिले नसते तर तरुणीने या संबंधांसाठी कधीच मान्यता दिली नसती. हे सर्व प्रकरण फसवणुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले. शिक्षेपासून वाचण्यासाठी डॉक्टरने कारण दिले की तरुणीचे आणि त्याचेही लग्न झालेले आहे. परंतु या कारणामुळे डॉक्टर निर्दोष ठरत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे कोर्टाने म्हटले. बलात्कार हा समाजताला सर्वात घृणास्पद गुन्हा आहे. यामुळे पीडितेचा शारीरिक, मानसिक त्रास होतो आणि तिच्या सामाजिक स्थानावर वाईट परिणाम होत असल्याचे कोर्टाने म्हटले. तसेच खुनामुळे व्यक्तीचे शरीर नष्ट होते परंतु बलात्कारामुळे व्यक्तीचा आत्मा नष्ट होत असल्याचेही कोर्टाने यावेळी म्हटले.

























































