
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लष्करामधील एका कॅप्टन पदावरील महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी एका मेजर जनरलची लष्करातून हकालपट्टी करा, अशी शिफारस आर्मी जनरल कोर्ट मार्शलने आज केली आहे. हे मेजर जनरल 2016मध्ये देशाच्या नैऋत्य भागात कार्यरत असताना ही लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे. याबाबतचा निकाल लेफ्टनंट जनरल पदाच्या समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याने कोर्ट मार्शलने आज दुपारी 3.30 वाजता दिला.
प्रकरणात मेजर जनरलला कलम 354 (छेडछाड) अन्वये आरोपी करण्यात आले. परंतु कोर्टाने खास चौकशी करून कलम 354अ अन्वये त्यांना आरोपी करण्यात आले. यानुसार झालेल्या सुनावणीत मेजर जनरल दोषी आढळल्यामुळे त्यांना लष्करातून बडतर्फ करण्याची शिफारस आर्मी जनरल कोर्ट मार्शलने केली आहे. या निकालाला आव्हान देण्यात येणार आहे, असे या मेजर जनरलची बाजू मांडणारे ऍड. आनंद कुमार यांनी सांगितले. मेजर जनरलची बाजू समजून घेतली नाही. पुराव्याची चिकित्सा व्यवस्थितपणे झालेली नाही, निकाल घाईघाईने दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कॅप्टन पदाच्या महिला अधिकाऱयाने लैंगिक शोषणाबाबत केलेले आरोप मेजर जनरलनी फेटाळले आहेत. 2016मध्ये लष्करप्रमुखांची नियुक्ती झाली. यावरून निर्माण झालेल्या गटबाजीचा मी बळी आहे, असा दावा मेजर जनरलने केला आहे.
आता हा निकाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या उच्चपदस्थांना ही शिक्षा बदलण्याचा अधिकार आहे.

























































