
सामना प्रतिनिधी, धुळे
रेल्वे प्रशासनाने दोंडाईचा ते अमळनेरपर्यंत तसेच दोंडाईचा-विखरण, सोनशेलू-शिंदखेडा, अमळनेर-टाकरखेडा असे तीन उडान पूल मंजूर केले होते. परंतु दोंडाईचा नगरपालिका हद्दीतील जुने शहादा रोडवरील रेल्वे गेट हे दोंडाईचा रेल्वे स्टेशनपासून 250 मीटर अंतरावर असल्यामुळे दिवसातून बऱयाच वेळेस ते बंद असते. त्यामुळे साहुर, शेंदवाडे, झोटवाडे, तावखेडा, दाऊळ, मंदाणे व दोंडाईचा परिसरातील सिंधी कॉलनी सहदिवसातून 25 हजार ग्रामस्थ या गेटकडून जाणारे आहेत. शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले, असे जिल्हा उपप्रमुख शाना सोनवणे यांनी सांगितले.
दोडाईचा शहराजवळील शहादा रस्त्यावरील रेल्वे गेटमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे 23 जुलैला शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक, साहुर, शेंदवाडे, झोटवाडे, तावखेडा, दाऊळ, मंदाणे सह दोंडाईचा परिसरातील सिंधी कॉलनी व दोंडाईचा परिसरातील ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. त्या वेळी दोंडाईचा रेल्वे स्टेशन मास्तरसह रेल्वेचे संबंधित अधिकाऱयांनी आश्वासन दिले होते, परंतु आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शाना सोनवणे यांसह शिवसैनिकांनी दोंडाईचा रेल्वे स्टेशन मास्तर राजेशकुमार झा यांना स्मरणपत्र दिले. आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर कुठलीही रेल्वे जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.
दोंडाईचा रेल्वे स्टेशन मास्तर राजेश कुमार झा यांनी सोनवणे यांना सांगितले की, रेल्वे भुयारी मार्गाऐवजी उड्डाण पुलाचे काम समाविष्ट केले आहे. त्यासाठी आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तरी आंदोलनास स्थगिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. या वेळी सोनवणे यांच्यासोबत शिवसेनेचे वासुदेव चित्ते, रजेसिंग गिरासे, संजय मगरे, किरण सावळे, गणेश भदाणे, लोटन देसले, राजधर सदाराव, नाना ठाकरे, सुनील ठाकरे आदी उपस्थित होते.




























































