
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची पाहणी स्वतः करता यावी, यासाठी शासनाने सुरू केलेले ई-पीक पाहणी अॅप तालुक्यात कोलमडून पडले आहे. तालुक्यात नेटवर्क येतच नसल्यामुळे हे अॅप सुरू करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल पण नाहीत. तसेच काहींना हा अॅप वापरायचा कसा याबाबत माहितीही नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येत नाही.
राज्य सरकारने ‘माझी शेती, माझा सातबारा, मी करेन माझा पीक पेरा पीक पाहणी’ असा गाजावाजा करत ई-पीक पाहणी अॅप सुरू केले खरे पण आता शहापूरमध्ये नेटवर्कच येईनासे झाल्याने हे अॅप सुरूच होत नाही. अॅपवर माहिती भरली तरी सातबाऱ्यावर नोंद उमटत नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक प्रयत्न करूनही हे अॅप सुरू होत नाही. अनइनस्टॉल करून पुन्हा इनस्टॉल केले तरीही अॅपची स्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. कृषी आणि महसूल विभागाने शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करायला हवे. फक्त अॅप देऊन उपयोग नाही, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या गावांतील शेतकऱ्यांना फटका
शहापुरातील नडगाव, लेनाड, दहिवली, अल्याणी, गेगाव, नांदगाव, साखरोली, अघई, सावरोली, पिवळी, दहागाव, खर्डी कसारा, डोळखांब, शेणवे, किन्हवली, टाकीपठार, मानेखिंड, वेळूक, ढाकणे, अजनुप, शिरोळ, टेंभा, वरसकोल, दहिगाव, बेलवड अशा दुर्गम डोंगराळ भागातील गावांमध्ये नेटवर्कच येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
पीक नोंद झाली तर
सातबाऱ्यावर काहीच दिसत नाही. पुन्हा नोंद केली तर क्षेत्र उपलब्ध होत नाही, असा संदेश येतो. नोंद झाली नाही तर नुकसानभरपाई, विमा यांसारखे लाभमिळणारच नाहीत, असे महसूल विभागाकडून सांगितले जाते. हे अॅप काढून सरकारने फायदा कमी आणि शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिक प्रमाणात वाढवली आहे.
– विजय खर्डीकर, शेतकरी.