शहापुरात जलयुक्त शिवार अभियान लालफितीच्या डोहात ‘बुडाले’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कैलास भरोदे, शहापूर

राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात शहापूर तालुक्यात त्याचा बोजवारा उडाला आहे. हे अभियान लालफितीच्या डोहात बुडाले असून यानिमित्ताने ठेकेदारांचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर आला आहे. जलयुक्त शिवार योजनेची वाट लावणाऱया ठेकेदारांना अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या. पण अद्यापि कोणतीही कारवाई न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियान ठाणे जिह्यात राबवले. शहापूर तालुक्यात लघुपाटबंधारे, वन तसेच कृषी या तीन विभागांमार्फत ही कामे करण्यात येतात. या अभियानांतर्गत जुनी भातशेती दुरुस्त करणे, जमीन सपाटीकरण, नाल्याकर दगडी बांधकाम, चर खोदणे, सिमेंट नाला बांधणे तसेच दुरुस्ती आदी कामे केली जातात. खरली – जुनाकनी, बाबरेकाडी, कोथळे, चांदगाव, आदिवली, मढ, पाटोळ, पिवळी, टेंभरे आदी 16 गावांमध्ये 983 कामे प्रस्तावित करण्यात आली हाती.

प्रस्तावित कामांपैकी 403 कामांनाच मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 294 कामे पूर्ण झाली, पण सुमारे दीड कोटीची तब्बल 109 कामे अजूनपर्यंत सुरूच करण्यात आलेली नाहीत. ही कामे मे महिन्यात पूर्ण होणे आवश्यक होते. प्रशासन आणि ठेकेदारांच्या बेफिकिरीमुळे शहापूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाचा बोजकारा उडाल्याने येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

‘त्यांना’ काळ्या यादीत टाका
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे पूर्ण करण्याची मुदत उलटून पाच महिने झाले तरीही ठेकेदारांनी 109 कामे अजून सुरूच केलेली नाहीत. या ठेकेदारांना अनेकदा नोटिसाही बजावण्यात आल्या. कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय कृषी अधिकाऱयांना पाठवला आहे. सरकारची जलयुक्त शिवार योजना लालफितीच्या डोहात बुडवणाऱया ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.