शहापूरचा भगीरथ अंगणात गंगा आणणार; भूगर्भातील दोन हजार फुटांपर्यंतचा डाटा उपलब्ध होणार

>> नरेश जाधव

स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणण्यासाठी भगीरथाने शंकराला प्रसन्न केले होते. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील एक भगीरथ दुष्काळी भागातील गावागावात आता गंगा आणणार आहे. खर्डी येथील संशोधक हेमंत परदेशी यांनी जमिनीतील पाणी शोधणारी मशीन तयार केली असून ती भूजल साठ्याची अचूक माहिती देत आहे. या अत्याधुनिक मशीनमुळे भूगर्भातील दोन हजार फुटांपर्यंतचा डाटा उपलब्ध होणार असल्याने ही मशीन शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार आहे.

भूजल साठा शोधण्यासाठी शेतकरी पारंपारिक पद्धतीचा वापर करतात. विहीर आणि बोअरवेल खोदण्यासाठी अनेक ठिकाणी नारळाचा उपयोग केला जातो. नारळाची शेंडी तळहातावर उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी भूजल साठा आहे, असे समजून विहीर आणि बोअरवेल खोदली जाते आणि अनेक वेळा शेतकऱ्यांची फसगत होते. या पद्धतीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. बहुतेक वेळा फक्त अंदाजानुसार विहीर आणि बोअरवेलचा पॉईंट दिला जातो. कधी कधी पाणी लागते तर कधी कधी बोअरवेल ३०० ते ४०० फूट अक्षरशः कोरडी जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. मात्र यापुढे अशा नुकसानीचा सामना शेतकरी आणि व्यावसायिकांना करावा लागणार नाही. कारण खर्डी येथील तरुण संशोधक हेमंत परदेशी हिंदुस्थानी बनावटीची आणि अतिशय कमी खर्चात अशीच एक भूजलाचा शोध घेणारी आणि वैज्ञानिक मान्यताप्राप्त मशीन बनवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर आणि बोअरवेल बिनधास्तपणे खोदता येणार आहे.

या मशीनमुळे शेतकऱ्यांचा विहिरीसाठी किंवा बोअरवेलसाठी पाणी शोधण्याचा प्रश्न आता सुटला आहे. भूजल किती फुटावर असू शकते, भूगर्भाची रचना कशी आहे, अधिक भूजल शेताच्या किंवा आपल्या प्लॉटच्या कोणत्या भागात आहे, विहीर कोठे खोदावी, हे प्रश्न सुटणार आहेत.

अभियांत्रिकी कामात, खनिज संशोधनात आणि पर्यावरण संशोधनात या मशीनचा खूप उपयोग होणार आहे. मशीन भूगर्भात २००० फूट खोलीपर्यंतचा डेटा घेऊ शकते. हेमंत परदेशी या मशीनचे पेटंट घेणार असून लवकरच या मशीनचे उत्पादन चालू करणार आहेत.

तरुणांना आणि इच्छुकांना या मशीनचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. जेणेकरून हे तंत्रज्ञान संपूर्ण देशभर पसरणार असून त्याचा उपयोग शेतकरी, उद्योजक आणि इतर नागरिकांना होणार आहे.

हेमंत परदेशी यांनी मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री घेतलेली असून त्यांना १३ वर्षांचा संशोधनाचा अनुभव आहे. याआधीही हेमंत परदेशी यांचे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या हिंदुस्थानातील एका मोठ्या कंपनीसाठी ३ वेगवेगळे संशोधनाचे ३ पेटंट्स आहेत.