शहापूर होणार डुक्करमुक्त; नगर पंचायतीची मोहीम

370

शहापुरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. स्वाइन फ्लूसारख्या आजाराची किंवा इतर संसर्गजन्य रोगांची लागण होऊ नये याची दक्षता घेत शहापूर नगरपंचायतीने डुक्करमुक्त शहापूर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारपासून सुरुवात करण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे 100 डुकरांना पकडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व डुकरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसची दहशत पसरली असताना नगरपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे शहापुरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहापुरातील ब्राह्मणआळी, कासारआळी, गोदाम परिसर, सोनार आळी, गंगारोड, मोहल्ला आदी ठिकाणी डुकरांच्या झुंडीचा मुक्त संचार असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले होते. यामुळे स्वाइन फ्लू किंवा संसर्गजन्य आजार, रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने डुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत शहापुर नगरपंचायतीकड़े तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत शहापुरच्या नगराध्यक्ष रजनी संतोष शिंदे, मुख्याधिकारी वैभव गारवे यानी तात्काळ मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बी.डी. परदेशी, अजिंक्य हुलवले, राहुल पाटील, काशीनाथ वेहेळे आणि कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत हद्दीतील डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी रात्रीपर्यंत 100 हुन अधिक डुकरे पकडण्यात आली असून टप्याटप्याने शहापुर शहरातील सर्व डुकरे पकडण्यात येणार असून शहापुर शहर लवकरच डुक्करमुक्त होणार असल्याची ग्वाही शिवसेनेच्या नगराध्यक्ष रजनी संतोष शिंदे यांनी दिली. याबाबत नगरपंचायत प्रशासनाने रीतसर कार्यवाही केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

डुकरे पकडून नेण्यास विरोध

यावेळी डुक्कर मालकांनी डुकरे पकडून नेण्यास तीव्र विरोध केला तसेच डुकरांनी भरलेली गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी व पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. अखेर डुकरांनी भरलेली गाडी पोलीस बंदोबस्तात शहापुर शहरातून रवाना करण्यात आली. नगरपंचायतीच्या या डुक्करमुक्त मोहिमेमुळे शहापुरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या