इज म्हंजी काय असती ते कळलं रे भाऊ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच शहापूरचा गरेलपाडा उजळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कैलास भरोदे । शहापूर

देशाला सावतंत्र्य मिलाला.. पण आम्ही कालुखातच व्हतो.. परगतीत आन् परकाशात दुनिया म्होरं गेली.. पन आमच्या पाड्यात साधी लायट न्हवती.. सावतंत्र्यानंतर 74 वरसांनी पयल्यांदा आमच्या पाड्यामंदी, घरामंदी इज आली. इज म्हंजी काय असती ते आता कळलं भाऊ… आमची बी पोरं उजळलेल्या दिव्याखाली बसून आता सिकतील, सायब होतील. आमचे बी दिस उजळतील… हे उद्गार आहेत मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूरच्या गरेलपाड्यावरील राजू धर्मा गरेल याचे… महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले आणि विकासकामांना गती दिली. त्यानंतर स्वातंत्र्यापासून अंधारात असलेला गरेलपाडा विजेने उजळून निघाला. त्याची लखलख  तेथील आदिवासींच्या चेहऱ्य़ावरही उमटली होती.

शहापूरपासून अवघ्या 32 किलोमीटर अंतरावर तानसा अभयारण्याच्या कुशीत वसलेला गरेलपाडा म्हणजे 90 कुटुंबांची वस्ती. स्वातंत्र्यानंतर देशाने विज्ञान, तंत्रज्ञानात भरारी घेत थेट चंद्र आणि मंगळापर्यंत झेप घेतली असली तरी गरेलपाडा मात्र अंधारात चाचपडत होता. अभयारण्यातील जंगली श्वापदांचा या पाड्यावर मुक्त वावर. त्यामुळे अंधारात एखाद्या गावकऱ्य़ाला नाहीतर पोराला हिंस्र श्वापद भक्ष्य बनवेल या भीतीने गावकऱ्य़ांची रात्री गस्त ठरलेलीच. त्याचा परिणाम दुसऱ्य़ा दिवशीच्या मोलमजुरीवरही व्हायचा. संध्याकाळ झाली की मुलाबाळांच्या अभ्यासाचा बट्टय़ाबोळ व्हायचा. रॉकेलवरच्या मिणमिणत्या दिव्याचा उजेड हाच आधार.

मोठ्या प्रयासाने हायटेन्शन केबल पोहोचल्या

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना अधिक गती मिळाली. ठाणे जिल्हा नियोजन विभागाने तत्काळ 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी गरेलपाड्याला उजेडात उजळवण्याचा निर्धार केला. वीज कर्मचाऱ्य़ांनी अतिदुर्गम भागात एचटी आणि एलटी लाइन मोठय़ा प्रयासाने पोहोचवली आणि मोठा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. घरोघरी वीज मीटरही पोहोचले आणि काही घरात दिवे उजळले.

गावकऱ्य़ांनी दिवाळी साजरी केली

आजचा दिवस आमच्यासाठी खरी दिवाळी आहे. सरकारचे लाख लाख आभार, अशी कृतज्ञता दीपक श्रावण खरपडे आणि देवराम गरेल या गावकऱ्य़ांनी व्यक्त केली. आमच्या घरात वीज आली. आता आम्ही रात्रीही अभ्यास करू, खूप शिकू, मोठ्या पदावरच्या नोकऱ्य़ा मिळवून आई-वडिलांचे दारिद्रय़ दूर करू, असा निर्धार अविनाश धोडी, शैलेश जनाटे आणि ममता चिमडा या विद्यार्थ्यांनी केला.