
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाझी खान (डीजी खान) परिसरात एक महाभयंकर स्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या अणू आयोग कार्यालयाजवळ हा स्फोट झाला असून यामुळे पाकिस्तान हादरला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज 30-50 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. हा दहशतवादी हल्ला नव्हता असे पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चिंतेची बाब ही आहे की जिथे हा स्फोट झाला तिथे युरेनियमचा साठा आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे. पाकिस्तानचे शाहीन-3 क्षेपणास्त्र अचानक सुटले आणि या साठ्याजवळ येऊन आदळले असे सांगितले जात आहे.
स्फोटानंतर डीजी खान आयुक्तांचे प्रवक्ते मजहर शेरानी यांनी मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. संबंधित विभागांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात आले असून या स्फोटात कोणाचाही बळी गेल्याचे अद्याप वृत्त नाही. सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून यात दावा करण्यात आला आहे की शाहीन-3 क्षेपणास्त्र, डेरा गाझी खान (डीजी खान) परिसरात आदळले.
पाकिस्ताची लपवाछपवी?
पाकिस्तानी लष्कराने ज्या भागात स्फोट झाला त्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद केल्याचे वृत्त आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांनाही स्फोटाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेबाबत पाकिस्तान सरकारने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण ट्विटरवर लोकांनी दोन तर्क मांडले आहेत. पहिल्या तर्कानुसार शाहीन क्षेपणास्त्राच्या अयशस्वी चाचणीमुळे हा स्फोट झाला तर दुसऱ्या तर्कानुसार पाकिस्तानच्या अणु प्रकल्पावर शत्रूच्या ड्रोनने हल्ला केला आहे. अर्थात या दोन्ही तर्कांना पुष्टी मिळालेली नाही.




























































